संजयनगर : शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भगदाड पडण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. राजर्षी शाहू महाराज मार्ग (शंभरफुटी) रस्त्यावर दिगंबर मेडिकलजवळ पुन्हा २० फुटांचे भगदाड पडले आहे. त्यामुळे या रस्त्याची सुरक्षितता चव्हाट्यावर आली आहे.सांगलीतील मुख्य रस्त्यांवर गेल्या चार महिन्यांपासून भले मोठे भगदाड पडत आहेत. एकाची दुरुस्ती पूर्ण होत नाही, तोपर्यंत नव्याने आणखी मोठे भगदाड पडू लागले आहे. शंभरफुटी रस्त्यावरील दिगंबर मेडिकल, अहिल्यादेवी होळकर चौकासह सहा ठिकाणी मोठे भगदाड पडले आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सहा महिन्यांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून शंभर फुटी रस्ता करण्यात आला; पण या रस्त्याचे काम निकृष्ट असल्याची तक्रार आयुक्तांकडे केली होती.आयुक्तांनी अभियंत्यांना कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याकडे अभियंत्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे रस्त्यावर तिसरा खड्डा पडला आहे. बांधकाम विभागात केवळ ‘टक्केवारी’चा बाजार सुरू आहे. आतापर्यंत महापालिका क्षेत्रात सहा भगदाड पडले आहेत. याचा निषेध लोकहित मंचच्या वतीने करण्यात आला. शंभर फुटी परिसरामध्ये नागरिकांनी आणि विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘कमिशन घ्या अन् खड्डा पाडा’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वसीम नायकवडी, सलीम पन्हाळकर, शिवसेना उद्धव ठाकरे गट सांगली शहर प्रमुख विराज बुटाले, अंजर फकीर, रफिक शेख, नईम मुल्ला, लियाकत शेख, समीर मोमीन आदी नागरिक उपस्थित होते.जोरदार निदर्शनेखड्डा पडल्याच्या घटनेनंतर परिसरात निदर्शने करत निषेध व्यक्त केला. लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे म्हणाले, सांगलीत खड्ड्यांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे रस्त्यांचा निकृष्ट दर्जा उघड होत आहे. दि. ४ ऑक्टोबरला सांगलीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येत आहेत. त्यांच्याकडे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे ऑडिट करावे, अशी मागणी करणार आहे.
सांगलीत शंभरफुटी रस्त्यावर पुन्हा पडले भलेमोठे भगदाड, निकृष्ट कामामुळे महापालिका क्षेत्रात सहाव्यांदा घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 12:22 PM