कवठेएकंद : भाजप-सेनेचे महाराष्ट्रातील सरकार सामान्यांचेच आहे. गेल्या १५ वर्षांच्या काळात अनेक समस्यांचा अभ्यास सरकारला आहे. जनतेला प्रश्न सांगण्याची गरज नाही. १५ वर्षांच्या समस्या अवघ्या ७० दिवसात संपणार नाहीत. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. आम्ही जुन्या सरकारसारखे आश्वासन देणार नाही. दिलेला शब्द पाळणारे आहोत, असे प्रतिपादन सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कवठेएकंद (ता. तासगाव) येथे भाजपच्यावतीने सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड उपस्थित होते. पाटील म्हणाले की, भू-विकास बँक चिंतेचाच विषय आहे. ‘भू-विकास’ला जगवता येणार नाही. रिझर्व्ह बँकेने भू-विकासला अवसायनात काढण्याचा आदेश दिला आहे, परंतु सरकार भू-विकासच्या कर्जदारांना तणावातून मुक्त करणार आहे. एकरकमी परतफेड योजना पुन्हा राबवू. शेतकऱ्यांच्यादृष्टीने हिताचा निर्णय घेऊ. कवठेएकंदच्या भू-विकासच्या कर्जदारांबाबतीत सकारात्मक निर्णय घेऊ, असा शब्द देतो. यावेळी अजितराव घोरपडे, अनिल कुत्ते, बापू धोत्रे, जयवंत माळी, संदेश भंडारे, रवी मगदूम, दीपक जाधव, गणेश पुजारी, बाळासाहेब पवार, सरपंच शरद लगारे, राजकुमार लंगडे उपस्थित होते. (वार्ताहर)
आश्वासने नाहीत, दिलेला शब्द पाळणार
By admin | Published: January 15, 2015 10:57 PM