वारणावती : चांदोली धरण परिसरात व पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात ५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे पाणीसाठा ८.७० टीएमसी झाला आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात गेले चार दिवस संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या परिसरात अतिवृष्टीची स्थिती निर्माण होत आहे. धरण क्षेत्रात शुक्रवारी ८५ मिलिमीटर पावसासह अतिवृष्टीची नोंद झाली. यानंतर शनिवारीही पावसाचा जोर कायम राहिला. ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. चालूवर्षी १ जूनपासून आजअखेर फक्त ३७६ मिलिमीटर एवढ्याच पावसाची नोंद झाली आहे. अद्याप या परिसरात संततधार पाऊस सुरूच आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तर मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे चांदोली धरणाच्या विस्तीर्ण पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्यामुळे वारणा धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरणात सध्या ८.७० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. संततधार पावसामुळे या परिसरातील सोनवडे, मणदूर, आरळा, करुंगली, गुढे-पाचगणीसह वाड्या-तोड्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना डोंगर-दऱ्यातून उभ्या पावसात वाट काढत जीवघेणी कसरत करीत शाळेला जावे लागत असल्याने शाळांच्या उपस्थितीवर पावसाचा परिणाम होत आहे. (वार्ताहर)
चांदोली धरणक्षेत्रात मुसळधार सुरूच
By admin | Published: July 03, 2016 12:29 AM