Sangli Politics: शिराळा मतदारसंघात राजकीय भूकंप होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 04:25 PM2024-08-05T16:25:15+5:302024-08-05T16:26:18+5:30
अजित पवार गट आगामी विधानसभेला नव्याने आगमन करणार
अशोक पाटील
इस्लामपूर : शिराळाविधानसभा मतदारसंघात विविध गटांचे स्वयंभू नेते आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. ऐन विधानसभा निवडणुकीत नेत्यांच्याच अस्तित्त्वाचा प्रश्न उभा ठाकतो. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाची एन्ट्री इस्लामपूर - शिराळा मतदारसंघाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभेला मतदारसंघात भूकंप होण्याची शक्यता आहे.
इस्लामपूर - शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. शिराळा तालुक्यात याच पक्षाचे आमदार मानसिंगराव नाईक यांचा वरचष्मा आहे. शिराळा मतदारसंघातील ४८ गावात जयंत पाटील यांच्या समर्थकांची फळी मोठी आहे. मतदारसंघात माजी मंत्री शिवाजीराव नाईक गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात सामील झाला. त्यामुळे सध्यातरी मानसिंगराव नाईक यांचे पारडे जड आहे. परंतु, ऐन विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव नाईक यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
शिराळ्यातील डोंगरी भागात प्रत्येकाचा गट असल्याचा दावा केला जातो. विशेषत: भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य सत्यजीत देशमुख यांच्या गटाचे वर्चस्व डोंगरी भागात आहे. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत आमदार होण्यासाठी त्यांच्या भूमिकाही महत्त्वाच्या आहेत. वाळवा तालुक्यातील शिराळा मतदारसंघात असलेल्या ४८ गावांतील उगवते नेतृत्व सम्राट महाडिक यांनी भाजपमध्ये आमदार होण्याचा पक्का विचार केला आहे. या दोघांना एकत्रित करण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.
शिराळा मतदारसंघात उद्योग वाढले नाहीत. त्यामुळेच येथील मतदार मुंबई येथे नोकरीसाठी गेले. यांच्यासाठी मतदारसंघात रोजगार मिळावा म्हणून मानसिंगराव नाईक यांनी शिराळ्यात उद्योग क्षेत्रात क्रांती करण्याचा डाव आखला. हेच ओळखून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिराळा मतदारसंघात साखर उद्योगाच्या नावाखाली राजकीय एन्ट्री करण्याची खेळी केली आहे. आता मतदारसंघात नवीन पवार गटाचा उदय झाल्यास आगामी विधानसभेला नेहमीप्रमाणे राजकीय भूकंपाची परंपरा कायम राहील.
शिराळा मतदारसंघात पारंपरिक लढती नेहमीच असतात. सध्यातरी आमची भूमिका शरदचंद्र पवार यांच्याबरोबरच ठाम आहे. येणाऱ्या काळात वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या भूमिकेवरच आगामी विधानसभेची लढत ठरेल. - रणधीर नाईक, माजी जि. प. सदस्य