संतोष भिसेसांगली : निवडणूक प्रचारासाठी आठवडा शिल्लक राहिला, तरी उमेदवारांच्या प्रचारात जिल्ह्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट दिसत नसल्याचे चित्र आहे. जाहीरनाम्यात, वचननाम्यात विकासाचे इमले दिसताहेत, पण जाहीर सभांमध्ये आणि मेळाव्यांमध्ये विरोधी उमेदवाराची साल काढण्याचेच काम सुरू आहे.प्रचारासाठी अवघा आठवडा शिल्लक राहिल्याने उणीदुणी काढण्याचे काम जोरात सुरू झाले आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि अपक्ष या तीन प्रमुख उमेदवारांनी जाहीरनामे, वचननामे जाहीर केले आहेत. त्यात सांगलीचे सिंगापूर करण्याची स्वप्ने दाखविली आहेत. कृषी विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र, रेल्वेचे विस्तारित जाळे, महामार्ग अशी अनेक आश्वासने दिली आहेत. मात्र जाहीर सभा, मेळावे यामध्ये विरोधी उमेदवारांची लायकी काढण्याचेच काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: महायुतीचे उमेदवार संजय पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यातील खडाजंगी अगदी सुरुवातीपासूनच जोरात सुरू आहे.तीनही उमेदवारांच्या प्रचारासाठी सध्या स्टार प्रचारक नसल्याने स्थानिक नेत्यांच्या जोरावरच मतदारांना वश करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत जाहीर सभा सुरू आहेत. सायंकाळी सहा ते रात्री दहा या महत्त्वाच्या वेळेत एका दिवसात तीन-चार गावांत सभा उरकल्या जात आहेत. या सभांमधील भाषणांचा नूर पाहिला, तर विकासाच्या आराखड्याऐवजी आरोपांची राळच अधिक पाहायला मिळत आहे.
संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्या परस्परांवरील टीकेत त्यांच्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे केलेले नुकसान हा समान मुद्दा आहे. चंद्रहार पाटील यांच्या आरोपांचा रोख विशाल पाटील यांच्या बंडखोरीवर अधिक आहे. ‘मी चांगला आणि तो कसा वाईट’ हेच मतदारांच्या माथी मारले जात आहे. पण ‘जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी माझे नियोजन काय?’ यावर मात्र कोणीही बोलताना दिसत नाही.तालुका नेत्यांचीही अळीमिळी गुपचिळीप्रचारासाठी फक्त आगामी आठवडाच शिल्लक राहिल्याने आरोपांची राळ अधिक जोरात होणार हे स्पष्ट आहे. त्यामध्ये त्या-त्या तालुक्यातले स्थानिक नेतेही भर घालत आहेत. ‘माझ्या तालुक्याचा विकास कोण, कसा करणार हे स्पष्ट करावे,’ अशी भूमिका एकाही स्थानिक नेत्याने घेतल्याचे दिसत नाही. स्वत:चे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येकाने प्रचाराची आणि पाठिंब्याची दिशा ठरवली आहे.