सदानंद औंधे
मिरज : मिरजेत महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या बालगंधर्व नाट्यगृहात मोठ्या आगीपासून सुरक्षिततेची कोणतीही व्यवस्था नाही. कोल्हापुरातील दुर्घटनेनंतर मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात आगीपासून सुरक्षेची यंत्रणा नसतानाही मनपा प्रशासनाने नाट्यगृह सुरू केल्याने प्रेक्षकांचा जीव धोक्यात आहे. कोल्हापुरातील दुर्घटनेपासून महापालिका प्रशासनाने बोध घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले बालगंधर्व नाट्यगृहाचे फायर ऑडिट झाले नसल्याने नाट्यगृह अनेक वर्षे सुरू झाले नव्हते. कलाकार, नाट्य रसिकांच्या आग्रहामुळे अग्नी सुरक्षा यंत्रणेची पूर्तता करण्याच्या अटीवर नाट्यगृह सुरू केले. मात्र, त्यानंतरही वाळूच्या बादल्या व अग्निरोधक सिलिंडर यावरच नाट्यगृह सुरू आहे. नाट्यपंढरी म्हणून ख्याती असलेल्या मिरजेत बालगंधर्व नाट्यगृहाची हेळसांड खेदजनक आहे. अनावश्यक कामांवर लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू असताना नाट्यगृहाच्या सुरक्षेबाबत मात्र उदासीनता आहे.बालगंधर्व नाट्यगृह मिरज शहरातील एकमेव नाट्यगृह आहे. पूर्वीच्या हंसप्रभा थिएटरला मोठी परंपरा आहे. बालगंधर्वांनी येथे रंगमंचावर पहिले पाऊल ठेवले. अनेक दिग्गज कलाकारांनी या रंगमंचावर आपली कला सादर केली. संस्थान काळात संगीत नाटकांनी या ठिकाणी रात्री जागविलेले जुने लाकडी हंसप्रभा नाट्यगृह पाडून तेथे सुमारे एक हजार प्रेक्षक क्षमतेचे मोठे अत्याधुनिक नाट्यगृह उभारले, मात्र आराखड्याप्रमाणे अनेक कामे पूर्ण न करताच नाट्यगृह सुरू केले. नाट्यगृहाभोवती रिंगरोड दाखविण्यात आला. त्यासाठी बाहेरील आवारातील नाट्यगृहाला अडचण होणारी दुकाने न पाडता काही कारभाऱ्यांच्या हस्तक्षेपाने या दुकानांना अभय मिळाले.यामुळे आणीबाणीच्या वेळी नाट्यगृहाच्या एकाच बाजूने अग्निशामक दलाचे वाहन आत जाऊ शकते. याविरुद्ध मिरजेतील काही जागरूक नागरिकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने महापालिकेला आराखड्याप्रमाणे कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले, तरीही याबाबत चालढकल झाल्याने नाट्यगृहाचा परवाना नूतनीकरण रखडला होता. अग्निरोधक यंत्रणा बसवण्याच्या अटीवर नाट्यगृह सुरू करण्याचा परवाना मिळाला, मात्र आजतागायत ही यंत्रणा बसवली नाही.नाट्यगृहासमोरील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे, हातगाड्या, विक्रेते, मोकाट जनावरे यामुळे वाहतूककोंडी नेहमीचीच आहे. नाट्यगृह सांभाळण्यास मनपाने केवळ एक कर्मचारी नेमला आहे. मिरजेची सांस्कृतिक ओळख असलेल्या या नाट्यगृहातील गैरसोयी दूर करून अग्निसुरक्षा यंत्रणेची व्यवस्था करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. नाट्यगृहाच्या आवारातील दुकाने व समोर रस्त्यावरील बेकायदा अतिक्रमणे हटविण्याची मागणी नागरिक वर्षानुवर्षे करीत आहेत. मात्र, बालगंधर्वची उपेक्षा संपत नसल्याने मिरजेतील नाट्यरसिक व नागरिक प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.
आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास मोठी हानीनाट्यगृहात नाट्यप्रयोगासाठी ही ध्वनियंत्रणेसह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने कलाकार, नाट्यसंस्था, प्रेक्षकांनी नाट्यगृहाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे येथे विविध शाळांची स्नेहसंमेलन व गेट-टुगेदर कार्यक्रम होत आहेत. येथे आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास मोठी हानी होण्याची शक्यता असल्याने कोल्हापुरातील दुर्घटनेपासून महापालिका प्रशासनाने बोध घ्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.