अशोक डोंबाळेसांगली : जिल्हा नियोजन समितीवर सदस्यांची नियुक्ती करण्यावरून राजकीय मतभेद टोकाला गेले. भाजप, शिवसेना शिंदे गटाची यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौघांची जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागली होती. त्यामुळे भाजप, शिवसेना शिंदे गटातील सदस्यांमध्ये नाराजी होती. अखेर २५ जानेवारी २०२४ रोजी नियोजन समितीवरील सदस्यांच्या नियुक्त्या शासनाने जाहीर केल्या, पण या यादीतून भाजपचे खासदार संजय पाटील समर्थक, भाजपचे मित्र पक्ष जनसुराज्य आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा पत्ता कट झाला आहे.
जिल्हा नियोजन समितीवरील शासन नियुक्त सदस्यांच्या यादीत जिल्हास्तरावरून प्रस्ताव पाठविले होते. त्यामध्ये जनसुराज्य युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम व राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर यांच्या नावाचा समावेश होता. ही यादी राष्ट्रवादी काँग्रेसचा गट महायुतीत येण्यापूर्वीची होती. भाजप-शिवसेनेची जिल्हा नियोजनची यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा नियोजनावर चार निमंत्रित सदस्यांची नियुक्ती झाल्याचा शासन आदेश जाहीर केला होता. त्यानंतर भाजप-शिवसेनेची शासनाकडे वर्षभरापासून प्रलंबित असलेली जिल्हा नियोजनची यादी २५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, माजी आमदार विलासराव जगताप या दिग्गजांसह ११ सदस्यांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. यामध्ये जनसुराज्य, राष्ट्रीय समाज पक्षाला प्रतिनिधित्व दिले नाही. तासगाव तालुक्यातून भाजपचे खासदार संजय पाटील गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील पाटील यांची शिफारस होती. शासनाकडे त्यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविला होता, पण यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सुनील पाटील यांचा पत्ता कट झाला आहे.
जिल्हा नियोजनचे सदस्यसंसद सदस्यांमधून आमदार सुधीर गाडगीळ (सांगली, भाजप), आमदार अनिल बाबर (गार्डी, ता. खानापूर, शिवसेना शिंदे गट), जिल्हा नियोजनासंबंधी ज्ञान असलेले सदस्य माजी आमदार विलासराव जगताप (जत, भाजप), शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार (इस्लामपूर, शिवसेना शिंदे गट), जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले विशेष निमंत्रित सदस्य जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख (कडेपूर, ता. कडेगाव, भाजप), माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख (कोकरुड, ता. शिराळा, भाजप), पोपट कांबळे (बौद्ध वसाहत, मिरज, आठवले गट), विनायक जाधव (कसबे डिग्रज, रयत क्रांती), जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव माने (कवठेपिरान, ता. मिरज, शिवसेना शिंदे गट), जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर (गार्डी, ता. खानापूर, शिवसेना शिंदे गट) व जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील (आटपाडी, शिवसेना शिंदे गट) यांना जिल्हा नियोजन समितीवर संधी मिळाली आहे.
राष्ट्रवादीच्या चौघांना संधीराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील चार सदस्यांना जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून संधी यापूर्वीच मिळाली आहे. यामध्ये ॲड. वैभव पाटील (विटा), सुनील पवार (सनमडी, ता. जत), पुष्पा पाटील (करगणी, ता. आटपाडी), पद्माकर जगदाळे (सांगली) यांचा समावेश आहे.