अशोक पाटील
इस्लामपूर : गेल्या पाच वर्षांत नगरपालिकेतील सत्ताधारी विकास आघाडीने वचनपूर्ती केल्याचा डांगोरा पिटला; परंतु शहरातील रस्ते मात्र ‘जैसे थे’च राहिले. पालिकेवर प्रशासक आल्यानंतर आता राष्ट्रवादी ‘विकासा’साठी सरसावली आहे. चौकाचौकांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांची डिजिटल पोस्टर उभी करून चकाचक रस्त्याची स्वप्ने दाखवली जात आहेत. मात्र रस्त्याच्या कामाच्या प्रारंभापलीकडे काहीच प्रगती दिसत नाही.
विकास आघाडीने भुयारी गटार योजनेला गती आणली, परंतु श्रेयवाद आणि चुकीच्या निर्णयामुळे ही योजना रखडली आहे. मुख्य चौकातील रस्त्यांवरील खड्डे त्रासदायक ठरत आहेत. जयंत पाटील यांनी शहरातील विविध रस्ते व गटारी कामांचे भूमिपूजन केले. परंतु प्रत्यक्षात विकासकामांना गती दिसत नाही.
पालिकेवर प्रशासक आले आणि शहरातील अतिक्रमणे, चौकाचौकातील पोस्टर हटवण्यात अली. हातगाडे, छोट्या टपऱ्यांना शिस्त लागली. परंतु मुख्य चौकातील रस्त्यांना मुहूर्त सापडला नाही. मुख्य कचेरी चौकातील वाळवा बझार समोरील रस्ता अपघाताला निमंत्रणच देत आहे. काही उपनगरांत गटारीची कामे नाहीत. गटारी तुंबल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. डेंग्यू, चिकुनगुन्यासारखे आजार पसरू लागले आहेत. आता पालिका निवडणुकीला सामोरे जाताना शहरातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी काही नेते धावू लागले आहेत. मोठ्या प्रमाणात निधी मिळवण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. त्याचे जाहिरातबाजी सुरू आहे.
श्रेयवादाचे राजकारण
सत्ताधारी विकास आघाडीत शिवसेनेचे नेतेही सहभागी होते. त्यांच्या कारकिर्दीत शहरातील बंद बागा सुरू झाल्या नाहीत. मात्र आता तेच बंद बागा सुरू करा, अशी मागणी करत उपनगरातील सुविधांचे राजकीय भांडवल करत आहेत, तर राष्ट्रवादी शहरात वचनपूर्तीचे फलक लावून विकासाची स्वप्ने दाखवत आहे.