आटपाडी : सध्या राज्यातील राजकारणामध्ये काय होईल सांगता येत नाही. कोण कधी शपथ घेईल, हे माहीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ‘अ’ व ‘ब’ टीम कोणती? हे अजून कळालेच नाही. भाजप महाविकासआघाडीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केला.आटपाडी तालुक्यात काँग्रेसच्या वतीने जनसंवाद यात्रा झाली. नेलकरंजी ते खरसुंडी पदयात्रा काढण्यात आली. खरसुंडी येथे पदयात्रेनंतर आयोजित सभेत आमदार डॉ. कदम बोलत होते. यावेळी विशाल पाटील, डॉ. जितेश कदम, अशोकराव गायकवाड, तालुकाध्यक्ष जयदीप भोसले, संभाजी जाधव, बाबासाहेब भोसले, शशिकांत देठे, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, राहुल गायकवाड, भगवान पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.कदम म्हणाले, केंद्र शासनाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. जाती-धर्मामध्ये भांडणे लावली जात आहेत. शेतकऱ्यांच्यावर अन्याय केला जात आहे. धनगर, मराठा आरक्षण, मराठा बांधवांना मारहाण, वारकऱ्यांवर लाठीचार्ज असे उद्योग केले जात आहेत.
विशाल पाटील म्हणाले, निवडणुका जवळ येत असल्यानेच तुम्ही निवडून दिलेले खासदार तुमच्याजवळ येत आहेत. बाकी काम शून्य असणारे खासदार आहेत. संसदेत एकही प्रश्न मार्गी लावला नाही. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही कमी पडलो म्हणूनच तुम्ही दुसऱ्याला निवडून दिले. मात्र, यापुढे कमी पडणार नाही.यावेळी डॉ. जितेश कदम, अशोक गायकवाड, जयदीप भोसले, अरुण वाघमारे, राहुल गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी ॲड. विलास देशमुख, सारिका भिसे, अरुण वाघमारे, विजय पुजारी, रमेश कातुरे, महेश पाटील, हणमंत गायकवाड, मोहन खरात, अजित गायकवाड, विलास शिंदे आदी उपस्थित होते.
जनसंवाद पदयात्रेस पाठिंबाकाँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेस वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, बहुजन समता पार्टी, होलार समाज संघटना, आंबेडकरवादी संघटना, मातंग समाज संघटना, मुस्लिम समाज संघटना यांनी पाठिंबा देत स्वागत केले.