अशोक पाटीलइस्लामपूर : राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर ''योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे'' सूतोवाच त्यांनी केले. मंत्रिमंडळ विस्तारातसांगलीला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे भविष्यात जयंत पाटील यांचा सरकारमध्ये प्रवेश होणार असल्याने सांगलीच्या मंत्रिपदाची संधी हुकल्याची चर्चा सुरू आहे.मुंबई येथे विधानसभा सभापती निवडीवेळी जयंत पाटील यांनी सरकार मध्ये सामील व्हावे, अशी ऑफर भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटातून त्यांना देण्यात आली. पण योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांच्यासाठी मंत्रीपद राखीव ठेवले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच सांगलीतील महायुतीच्या कोणाला ही संधी मिळाली नाही.विधानसभा निवडणूकीपूर्वी महाविकास आघाडी सत्तेत आली, तर जयंत पाटील मुख्यमंत्री होतील, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला होता. परंतु, निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पडझड झाली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष या नात्याने जयंत पाटील अस्वस्थ आहेत.
सध्यातरी आपण शरद पवार यांच्यासोबत आहोत. त्यामुळे अफवावर कार्यकर्त्यानी विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. तरीही मंत्रीमंडळाच्या विस्तारात सांगली जिल्ह्याला स्थान न दिल्याने जिल्ह्यातील मंत्रिपद पाटील यांच्यासाठी रिक्त ठेवल्याच्या चर्चेला पुन्हा जोर आला आहे.
जयंत पाटील यांची इस्लामपुरात कोंडी..इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांचे मताधिक्य घटले. निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यांची कोंडी केली. त्यामुळे पुढील राजकीय भविष्यासाठी पाटील काय निर्णय घेतात, याची उत्सुकता आहे.