वारणावती : चांदोली धरणाच्या पायथ्याशी वारणा नदीच्या पाण्यातून शनिवारी सायंकाळी डॉ. राहुल मगदूम (वय ३५) हे वाहून गेले होते. त्यांचा रविवारीही शोध घेण्यात आला; पण शोधपथकाला यश आले नाही.
शनिवारी दुपारी इस्लामपूरहून सातजण पर्यटनासाठी चांदोली परिसरात आले होते. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे हे सर्वजण बालमित्र होते. जेवण आटोपून यातील तिघेजण वारणा नदीत उतरले. यातील डॉ. राहुल मगदूम हे पाण्यातील भोवºयात अडकले. ही बाब नदी काठावरील मित्रांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ झाडाच्या फांद्या तोडून राहुल यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने ते पुढे वाहून गेले.
याबाबत कोकरूड पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनीही घटनास्थळी येऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र विजांचा कडकडाट तसेच अचानक सुरू झालेला पाऊस, अंधारामुळे शोधात अडथळा निर्माण झाला. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरूच होते.
रविवारी सकाळी घटनास्थळी शिराळ्याचे तहसीलदार गणेश शिंदे, कोकरूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी भेट देऊन शोधकार्य सुरू केले. दरम्यान, दुपारी दीड ते दोनच्या सुमारास सांगली येथील जीवरक्षक दलामार्फत बोटीच्या साहाय्याने वारणा नदीपात्रात शोध घेण्यात आला. नदीपात्रात पाण्याचा वेग प्रचंड असल्याने शोधकार्यात अडचणी निर्माण होत होत्या. सध्या चांदोली धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद केले आहे. मात्र डॉ. राहुल मगदूम यांचा चोवीस तास उलटून गेले तरीही कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.