सांगली : आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेवर दाखल ६२ हरकतींपैकी केवळ एकाच हरकतीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली. पण या हरकतीमुळे महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रभाग रचनेत कोणताही बदल झालेला नाही. आयोगाच्या आदेशानुसार अखेर प्रभाग रचनेवर अंतिम शिक्कामोर्तब केले असून, ते राजपत्रातही प्रसिद्ध केल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत सांगितली.
महापालिकेची निवडणूक यंदा चारसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होत आहे. त्यासाठी प्रशासनाने प्रारुप प्रभाग रचना तयार केली होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशाने प्रभाग रचना व आरक्षण सोडत काढण्यात आली. यंदाच्या निवडणुकीसाठी २० प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्यातील १८ प्रभाग चारसदस्यीय, तर दोन प्रभाग तीनसदस्यीय आहेत. या प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व आक्षेप घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या मुदतीत ६२ तक्रारी आल्या होत्या. या हरकतींची सुनावणी झाली. त्यांचा अहवाल आयुक्त खेबूडकर यांनी राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. आयोगाने ६२ पैकी एकाच तक्रारीची दखल घेत अंशत: बदल केला आहे. उर्वरित सर्व तक्रारी अमान्य करण्यात आल्या.
याबाबत खेबूडकर म्हणाले, प्रभाग रचनेवर दाखल तक्रारींपैकी एकमेव बदल मान्य केला आहे. त्यामध्ये विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रगणक गट क्रमांक ४७ बाबतची तक्रार मान्य करण्यात आली. प्रगणक गट फोडता येत नसल्याने हा गट एकाच प्रभाग १९ मध्ये समाविष्ट केला होता. या गटातील ७५ लोक हे सांगली, मिरज महामार्गाच्या उत्तरेकडे राहणारे आहेत. त्यांनी रस्ता ओलांडून दक्षिण बाजूला मतदानासाठी जावे लागत असल्याची हरकत घेतली होती. ती हरकत आयोगाने मान्य करीत, प्रगणक गट फोडून ७५ लोकसंख्या प्रभाग ८ कडे वळविली आहे. इतर हरकतींपैकी ८ अंशत:, तर ७ वर्णनात्मक (भागाच्या उल्लेखाबाबत त्रुटी) मान्य करण्यात आल्या. त्यामुळे कुठेही प्रारुप प्रभाग रचना, आरक्षणाला धक्का लागलेला नसल्याचे सांगितले.महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी २१ मेअखेरची मतदारयादी ग्राह्य धरली जाणार आहे. प्रभागनिहाय मतदारयाद्या तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. आयोगाच्या सूचनेनंतर या मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर हरकती मागवून सुनावणीही होईल. येत्या ११ मे रोजी नव्याने मतदार नोंदणीची मोहीमही हाती घेत असल्याचे ते म्हणाले.आॅनलाईन तक्रारीचा प्रयोगखेबूडकर म्हणाले, प्रभागरचना आरक्षणानुसार महापालिकेच्या निवडणूक संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. शिवाय यापुढे निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली सर्व कामकाज आॅनलाईन चालणार आहे. एवढेच नव्हे, तर निवडणूक कालावधित महापालिका क्षेत्रात कुठेही निवडणूक आचारसंहिता भंगसारखे प्रकार घडत असतील तर, नागरिकांनी त्याबाबत आॅनलाईन तक्रारी कराव्यात. त्यांची नावे, मोबाईल नंबर गोपनीय ठेवून निवडणूक आयोग संबंधितांवर कारवाई करणार आहे. आॅनलाईन तक्रारीचा हा प्रयोग पहिल्यांदाच सांगलीत होत असल्याचे ते म्हणाले.