वाटेगाव : गावाने सर्वधर्म समभाव मानून जातीय, धार्मिक सलोखा जपावा. व्यसनमुक्ती व स्वच्छता अभियानातही हिरीरीने सहभाग दर्शवावा. गाव तंटामुक्त झाले आहे. आता येथे पुन्हा तंटा नको, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी केले.महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात वाटेगाव जिल्ह्यात एकमेव गाव तंटामुक्त म्हणून जाहीर झाले आहे. याबद्दल शासनाकडून ७ लाखांचे बक्षीस गावाला मिळाले आहे. या धनादेशाचे वितरण जिल्हा पोलीसप्रमुख सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदीप चव्हाण, सरपंच राहुल चव्हाण, उपसरपंच संपतराव मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती.दिलीप सावंत म्हणाले की, या अभियानाने राज्यात यशस्वी वाटचाल केली आहे. लाखो रुपयांचा निधी या अभियानाच्या माध्यमातून गावांना मिळालेला आहे. मात्र गावांनी गावात नसल्याने होणारे तंटे वादी- प्रतिवादी यांच्यात समझोता करून तडजोडीस आणावेत. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होते. हा प्रकार फक्त त्या दोन व्यक्तींनाच घातक नाही, तर त्यांच्या भांडणाचा ताण शासन यंत्रणेवर येत असतो. त्यामुळे गावातील तंटा गावातच मिटला पाहिजे. समितीला जादा अधिकार दिले असून त्याचा वापर करून दिवाणी, महसुली व फौजदारी तंटे समितीने सोडवावेत, असे आवाहनही सावंत यांनी केले.यावेळी ग्रा. पं. सदस्य प्रकाश पाटील, काकासाहेब चव्हाण, रवींद्र दुकाने, एम. आर. पाटील, जे. सी. ठोंबरे, रघुनाथ रसाळ, अर्जुन पाटील, प्रवीण पवार, ग्रामविस्तार अधिकारी एस. आर. पाटील, तलाठी एस. जे. तांबोळी उपस्थित होते. (वार्ताहर)
तंटामुक्त गावात आता तंटा नको
By admin | Published: December 04, 2014 10:03 PM