जत : सांगली जिल्ह्याला मंत्रिपदाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने न्याय दिला आहे. जिल्ह्यात व राज्यात विरोधकांचे अस्तित्वच शिल्लक राहिलेले नाही. भारतीय जनता पक्षाशिवाय आता जनतेसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही, असे मत सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केले.
जत येथे मंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश खाडे म्हणाले, जत येथील राजे विजयसिंह डफळे कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही कार्यकर्त्यांची फळी मजबूत केली होती, ती आजपर्यंत कायम राहिली आहे. त्याचा फायदा मागील पंधरा वर्षात भारतीय जनता पक्षाला होत आहे. यापुढेही विलासराव जगताप यांना त्याचा उपयोग होईल. जनता भक्कम साथ देईल.
खासदार संजय पाटील म्हणाले की, जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६५ गावांत विस्तारित म्हैसाळ योजनेचे भूमिपूजन आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यतेसाठी हा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश संबंधितांना दिले आहेत. आमदार विलासराव जगताप म्हणाले, राजकीय व सामाजिक प्रश्न घेऊन मी सातत्याने संघर्ष केला आहे. अल्पावधीतच मी तालुक्यातील प्रत्येक गावाचा दौरा करून माझी भूमिका स्पष्ट करणार आहे.
सुनील पवार यांनी स्वागत केले. यावेळी प्रकाश जमदाडे, हर्षवर्धन देशमुख, आप्पासाहेब नामद, रेखा बागेळी, स्नेहलता जाधव, श्रीदेवी जावीर, कविता खोत, श्रीपाद अष्टेकर, विजू ताड आदी उपस्थित होते.मतभेद मिटविणारपृथ्वीराज देशमुख म्हणाले, जत तालुक्यात भाजपअंतर्गत मतभेद असले तरी, ते एकत्रित बसून मिटवता येणार आहेत. आम्ही ते लवकरच मिटवत आहोत. कार्यकर्त्यांत कोणताही संभ्रम राहणार नाही. लोकसभा निवडणुकीत विकासावरच मतदान झाले आहे, हे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही विकासावरच मतदान होईल.