सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढविणार नसून, त्याची माहिती पक्षश्रेष्ठींना दिली आहे. पण सांगली विधानसभेची निवडणूक मात्र आपण निश्चित लढविणार असल्याची भूमिका मंगळवारी काँग्रेस नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली. यासंदर्भात मदनभाऊ गटाच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांची रविवारी बैठक होत आहे. या बैठकीत श्रीमती पाटील विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत.
सांगली लोकसभा व विधानसभेची जागा काँग्रेसकडे आहे. लोकसभेसाठी पक्षातून माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची नावे चर्चेत आहेत, तर विधानसभेसाठी विशाल पाटील, जयश्रीताई पाटील इच्छुक आहेत. यापूर्वी या मतदारसंघातून वसंतदादांनंतर मदनभाऊ पाटील यांनी विजय मिळविला होता. मदनभाऊंच्या निधनानंतर त्यांच्या गटाची सूत्रे जयश्रीताई पाटील यांच्याकडे आहेत. महापालिकेच्या निवडणुकीतही त्यांनी नेतृत्व केले होते. महापालिकेतही मदनभाऊ गटाचे नगरसेवक अधिक आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मदनभाऊ गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी विष्णुअण्णा भवन येथे बैठक घेत विधानसभेच्या रणनीतीवर चर्चा केली.
या बैठकीला माजी महापौर किशोर जामदार, हारूण शिकलगार, किशोर शहा, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, नगरसेवक संतोष पाटील, फिरोज पठाण, प्रकाश मुळके, माजी उपमहापौर प्रशांत मजलेकर, प्रशांत पाटील, अमर निंबाळकर, संजय कांबळे, माजी नगरसेवक अजित सूर्यवंशी, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रवीण पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शिकंदर जमादार, माधवनगरचे अमर पाटील, नांद्रेचे एम. एस. पाटील, सुधाकर नवाळे, सुभाष यादव, शीतल लोंढे, रत्नाकर नांगरे, कय्युम पटवेगार, युसूफ जमादार आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या निवडणुकीत भाऊंची उणीव जाणवली. त्यामुळे सत्तापरिवर्तन झाले. मात्र आता जयश्रीताई पाटील यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. भाऊंचे प्रामाणिक कार्यकर्ते आजही जयश्रीताई पाटील यांच्याबरोबर आहेत. त्या कार्यकर्त्यांच्या जोरावर विधानसभेचे गणित मांडण्यात येणार आहे. काहींनी भाऊ गटाचा सहवास सोडला आहे. त्यांना पुन्हा भाऊ गटात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाटील यांना निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करण्याचा निर्धार शीतल लोंढे व इतर कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला. त्यानंतर या प्रमुख कार्यकर्त्यांनी जयश्रीताई पाटील यांची भेट घेऊन बैठकीची माहिती देत विधानसभेसाठी आग्रह धरला. त्याला श्रीमती पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.
यासंदर्भात काँग्रेस कार्यकर्ते व मदनभाऊ गटाच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची व्यापक बैठक रविवार २७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत श्रीमती पाटील मार्गदर्शन करणार असून, त्याचदिवशी विधानसभेसाठी रणशिंगही फुंकतील, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीमदनभाऊ पाटील यांच्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना वाºयावर सोडणार नाही, अशी शपथ घेऊन सक्रिय राजकारणात आले आहे. शेवटपर्यंत कार्यकर्त्यांना अंतर देणार नाही. आपण लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे पक्षश्रेष्ठींना कळविले आहे. त्यामुळे लोकसभा लढविण्याचा प्रश्नच येत नाही. पण कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मात्र उतरणार आहोत, अशी भूमिका श्रीमती पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली.