सांगली : जातपंचायतीच्या माध्यमातून जातीअंतर्गत होणाऱ्या शोषणाविरोधातील लढाई कठीण असली तरी, ती आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी रविवारी सांगलीत व्यक्त केले. इतर जातींकडून होणाºया शोषणाविरुद्ध आवाज उठवला गेला, मात्र स्वत:च्या जातीतील जातपंचायतीच्यावतीने समांतर न्याय व्यवस्था निर्माण करून केल्या जाणाºया शोषणाविरोधात समाजात जागरुकता नाही, असेही ते म्हणाले.महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने सांगलीत जयहिंद अॅकॅडमीमध्ये सामाजिक बहिष्कार विरोधी कायदाविषयक प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी पाटील बोलत होते. अॅड. के. डी. शिंदे यांच्याहस्ते कायद्याच्या प्रचारासाठी तयार केलेल्या पोस्टर्सचे प्रकाशन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रधान सचिव प्रशांत पोतदार, राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, प्रशिक्षण कार्यवाह सुनील स्वामी, राहुल थोरात, डॉ संजय निटवे उपस्थित होते.पाटील म्हणाले, कायद्याचे राज्य निर्माण करणे म्हणजे समाजातील शोषणाच्याविरोधात संविधानातील मूल्यांना अनुसरून नवीन कायदे बनवणे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासन व स्थानिक प्रशासनाला कृतिशील करणे आहे, हे समजून घेतले पाहिजे.अॅड. मनीषा महाजन यांनी, हा कायदा काय आहे, याची सविस्तर माहिती सांगितली. त्या म्हणाल्या, जातपंचायतीच्या शोषणाच्या पहिल्या बळी महिलाच असतात. ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील महिलांच्या शोषणाच्या अनेक घटना समोर आणून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. जातपंचायत म्हणजे केवळ एकाच जातीचा समूह नसून, मानवाधिकाराला बाधा आणणारे विविध समूह म्हणजे जात पंचायतीच आहेत. अॅड. तृप्ती पाटील यांनी जातपंचायतीच्या शोषणाविरोधात या कायद्याशिवाय भारतीय दंडविधानातील इतर कोणती कलमे लावता येतील, याची माहिती दिली.यावेळी रमेश माणगावे, रमेश वडणगेकर, शंकर कणसे, नीशा भोसले, नंदिनी जाधव, अजय भालकर, चंद्रहार माने, राधा वंजू यांच्यासह रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.अनुभवकथन...जात पंचायतीविरुद्ध समाजातील काही कुटुंबांवर अन्याय झाला. याविरुद्ध ‘अंनिस’च्या मदतीने लढा देणारी काही कुटुंबे या शिबिरास आवर्जून उपस्थित होती. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने त्यांच्यावर कशाप्रकारे अन्याय झाला, त्याला तोंड कसे दिले, पोलीस का मदत करीत नाहीत, याबद्दलचे अनुभव कथन केले.
जातपंचायतीच्या शोषणाविरुद्ध लढा गरजेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 11:27 PM