सांगली : महापालिकेच्या ६० कोटी रुपयांच्या एलईडी पथदिवे निविदेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देऊन अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या मुदतीतही केवळ दोनच निविदा दाखल झाल्या होत्या. त्यामुळे आयुक्त नितीन कापडणीस यांनी या निविदा उघडण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिका क्षेत्रात ३२ हजार पथदिवे आहेत. राज्य शासनाने ईईएसएल या खासगी कंपनीला एलईडी पथदिवे बसवण्याचा ठेका दिला होता. मात्र कंपनीच्या अटी व शर्तींमुळे महापालिकेला पंधरा ते वीस कोटी रुपयांचा बोजा सहन करावा लागणार होता. त्यामुळे ईईएसएल कंपनीपेक्षा कमी दराने एलईडी दिवे बसवून देणाऱ्याला ठेका देण्याचा ठराव महासभेने केला. त्याला नगर विकास विभागानेही मान्यता दिली. एलईडी पथदिवे प्रकल्प ६० कोटी रुपयांचा आहे. ही रक्कम महापालिका किंवा शासनाकडून दिली जाणार नाही. एलईडी दिवे बसविल्यानंतर वीजबिलात होणारी बचतीची रक्कम ठेकेदाराला दिली जाणार आहे. या रकमेतील पाच टक्के रक्कम ठेकेदाराकडून महापालिकेला मिळणार आहे.
महापालिकेने एलईडी पथदिवे प्रकल्पासाठी २६ मार्च रोजी निविदा प्रसिद्ध केली. निविदा मागविण्याची अंतिम तारीख २२ एप्रिल होती. मात्र कोरोनामुळे काही पुरवठादारांनी निविदा भरण्यास मुदतवाढ मागितली. त्यामुळे प्रशासनाने मुदतवाढ दिली. या मुदतीतही केवळ दोन निविदा आल्या. किमान तीन निविदा आल्याशिवाय त्या उघडता येत नाहीत. त्यामुळे निविदेस दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीतही ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली गेली. त्याची मुदत मंगळवारी संपली. या कालावधीतही पूर्वीच्या दोन निविदावगळता तिसरी निविदा दाखल झालेली नाही. त्यामुळे आता आयुक्तांनी प्रकल्पाच्या निविदा तांत्रिक कागदपत्रांचे लिफाफे उघडण्याचे आदेश दिले आहेत.
कोट
एलईडी पथदिवे प्रकल्पाच्या निविदेला तीनदा मुदतवाढ देऊनही केवळ दोनच निविदा दाखल झाल्या आहेत. आता या दोन्ही निविदा उघडण्याची सूचना केली आहे. पहिल्यांदा तांत्रिक लिफाफा उघडला जाईल. त्यात पात्र असलेल्या ठेकेदारांचा दराचा लिफाफा उघडण्यात येईल. त्यानंतर ठेकेदार निश्चितीची प्रक्रिया होईल.
- नितीन कापडणीस, आयुक्त, महापालिका