अविनाश बाड ल्ल आटपाडी‘अहो, महिला पोलिस आटपाडीत उपलब्ध नाहीत, म्हणून आम्ही तलावातील पाणी शेतीला सोडू शकत नाही..!’ आटपाडीतील शेतकऱ्यांना गेले २० दिवस पाटबंधारे विभागाचे अधिकारी असे हास्यास्पद उत्तर देऊन त्यांची कुचेष्टा करीत आहेत. गेली २१ वर्षे दुष्काळग्र्रस्तांनी अनेक आंदोलने केल्यानंतर, तलावात आलेल्या टेंभूच्या पाण्याने शेतात पिके डोलण्याऐवजी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग सुरू केला आहे.बनपुरी (ता. आटपाडी) गावाजवळ कचरेवस्ती तलाव आहे. या तलावात सोडलेले टेंभू योजनेचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या ज्वारीच्या पिकाला फुकट नव्हे, तर रितसर पाणीपट्टीची रक्कम भरून घेऊन मिळावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पाटबंधारे विभागाने पाणी सोडलेही होते. पण तलावाच्या परिसरात असलेल्या काही शेतकऱ्यांनी दि. १६ डिसेंबरपासून पाणी बंद करून खाली पाणी सोडण्यास नकार दिला आहे. त्यांचे म्हणणे असे की, पुन्हा तलावात कधी पाणी सोडणार, हे नक्की नाही आणि पुन्हा टेंभूचे पाणी तलावात सोडले नाही, तर पाणीटंचाई निर्माण होईल. भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याऐवजी भले आम्हाला तुरुंगात टाका, अशी टोकाची भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यांची भीती आणि पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार पाहता, अनाठायी नसली तरी, त्यांना वस्तुस्थिती सांगून त्यांची समजूत घालण्याऐवजी पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग करीत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आहे.या तलावाची पाणी साठवण क्षमता ५५.८३ दशलक्ष घनफूट असून, सध्या ३२.८३ दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा वापरण्यायोग्य आहे. यापैकी आरक्षित पाणीसाठा ठेवून उर्वरित पाणी ज्वारीच्या वाळून चाललेल्या पिकाला तात्काळ द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पण पाटबंधारे विभाग वेळकाढूपणाची भूमिका घेताना दिसत आहे. गेल्या २० दिवसात अधिकाऱ्यांनी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना वस्तुस्थिती सांगून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामध्ये यश येत नाही, तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करून पोलिस बंदोबस्त घेऊनही पाणी सोडले नाही. २० दिवस शेतकरी पाटबंधारे कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. पिके वाळून चालली आहेत.या पार्श्वभूमीवर शुक्र्रवारी (दि. ६ जानेवारी) रोजी जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली येथील पाटबंधारे कार्यालयात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. पण अधिकाऱ्यांनी पाणी न सोडण्याचे एकमेव कारण हे महिला पोलिस उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. वास्तविक ही जबाबदारी पोलिसांची आहे. उपविभागीय अभियंता तानाजी माळी यांच्यासमोर सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर देढे यांनी, ‘तुम्ही तारीख सांगा, बंदोबस्त देण्याची जबाबदारी आमची आहे’, असे आंदोलकांसमोर सांगितले. त्यामुळे पाटबंधारे विभाग वेळकाढूपणा का करीत आहे, हे समजणे कठीण आहे. शिवाय दोन्हीही बाजूच्या शेतकऱ्यांत गैरसमज पसरवून त्यांच्यात भांडणे लावण्याचा उद्योग करीत आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.आम्ही सोडतो : तुम्ही बंद करा!शेतकऱ्यांनी दबाव वाढविल्यावर अधिकारी तलावावर गेले आणि विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणाले, ‘आम्ही पाणी सोडतो, आम्ही इथून गेलो की मागे तुम्ही बंद करा!’ शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या साक्षीनेच असा आरोप केला. कचरेवस्ती तलावातील १६ दशलक्ष घनफूट पाण्याचे पिण्यासाठी आरक्षण असल्याचे शाखा अभियंता व्ही. आर. केंगार यांनी सांगितले, तर उपविभागीय अभियंता तानाजी माळी यांनी २५ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केल्याचे सांगून, सावळा गोंधळ स्पष्ट केला.
महिला पोलिस नसल्याने पाणी नाही
By admin | Published: January 09, 2017 12:31 AM