इस्लामपूर : प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्याची गरज आहे. नियमितता, काटेकोर आर्थिक नियोजन व ताळेबंद, पारदर्शक व्यवहार आणि सचोटी अशी मूल्ये प्रशासकीय सेवकांनी स्वत:मध्ये रुजवली, तर कार्यालयीन कामकाजात गतिमानता येते, असे मत रयतमधील निवृत्त लेखापरीक्षक जी. एस. भस्मे यांनी व्यक्त केले.
येथील महात्मा फुले शिक्षक संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय अंतर्गत प्रशासकीय कामकाज व आर्थिक ताळेबंद या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा झाली. संस्थेच्या सचिव सरोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. ए. बी. पाटील अध्यक्षस्थानी होते.
या कार्यशाळेमध्ये संस्थेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक, लेखापाल, प्रशासकीय सेवक व प्राध्यापक उपस्थित होते. सरोज पाटील यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगून स्वागत व परिचय करून दिला. प्रा. आर. व्ही. दांडगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रबंधक एस. जे. कदम यांनी आभार मानले. व्ही. एल. पाटील, पी. बी. नलवडे, शशिकांत बामणे, रोहित पाटील यांनी संयोजन केले.