सांगली : कोल्हापूर रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयामागे ड्रेनेजची ओव्हलफ्लो लाइन खचल्याने मंगळवारी रस्त्याला भगदाड पडले. तात्पुरती उपाययोजना करून येथील सांडपाणी नाल्यामध्ये सोडण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या मुख्य कामासाठी किमान दोन महिने लागतील, असा अंदाज आहे. गेल्या दोन महिन्यांत सहा ते सात ठिकाणी ड्रेनेजलाइन खचल्याने रस्त्याला भगदाड पडले आहे.शहरात शंभर फुटी रोडसह अनेक ठिकाणी ड्रेनेजलाइन जीर्ण झाल्या आहेत. त्या खचल्याने रस्त्याला भगदाड पडण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. एकीकडचे भगदाड बुजविताना दुसरीकडे भगदाड पडलेले दिसते. मंगळवारी सकाळी कोल्हापूर रोडवर अचानक रस्ता खचला. काही मिनिटात भगदाड पडले.पंधरा-वीस फूट खाली असलेली ड्रेनेजलाइन पूर्णपणे खचल्याने परिसरातील नागरिक हादरले. ही लाइन १९७० मध्ये बसविली आहे. ओव्हरफ्लो लाइन असल्याने यामुळे या परिसरातील घरांमध्ये सांडपाण्याच्या बॅकवॉटरचा धोका आहे. इंजिन लावून हे सांडपाणी भोबे गटारीपुढील नाल्यात सोडण्याचे नियोजन आहे.ड्रेनेज व्यवस्था कोलमडल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. ठोस उपाययोजना प्रशासनाने कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
सागंलीतील कोल्हापूर रस्त्यावर पडले भगदाड, महापालिकेवर नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 5:35 PM