गंगाराम पाटीलवारणावती : शिराळा तालुक्यात डोंगर रांगांमध्ये आगी लावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यात अनेक जीव-जंतू सरपटणारे प्राणी वनस्पती बेचिराख होत आहे. वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात येत आहे. परिणामी गवे बिबटे मानवी वस्तीत शिरकाव करत आहेत. तर आगीमुळे डोंगर रांगा काळ्या ठिक्कर पडून नैसर्गिक सौंदर्य काळवंडले आहे.फेब्रुवारी, मार्च महिना सुरू झाला की शिराळा तालुक्यातील अनेक डोंगररांगांमध्ये वणवे लागतात. वाळलेले गवत जळून राख होते. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते या आगीमुळे जमिनीतील चौदा प्रकारची अन्नद्रव्य नष्ट होतात. नैसर्गिक कंपोस्ट खत निर्मिती थांबते. अनेक दुर्मिळ वनस्पती नष्ट होतात. अन्नसाखळी तुटते.काही विकृत माणसांकडून गंमत म्हणून वाळलेल्या गवतावर काड्या टाकण्याचे प्रमाणही अधिक आहे. एकदा वनवा पेटला की शेकडो एकर गवत जळून खाक होते. अशा गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी जैवविविधता कायद्याअंतर्गत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे अधिकार आहेत. त्याची अंमलबजावणी झाली तर हे प्रकार आटोक्यात येतील. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. नैसर्गिकरित्या आग लागण्याचे प्रकार तालुक्यात फारसे आढळलेले नाहीत.आगीचा परिणामआगीमुळे पाला पाचोळा, वाढलेली झुडपे जळून राख होतात. जमिनी उघड्या पडतात. पावसाचे पाणी या जमिनीवर थेट वेगाने पडते. त्यामुळे सुपीक मातीचा थर वाहून जातो. जमिनीची धूप होऊन पाणी धारण करण्याची क्षमता कमी होते. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावते. विहिरी तलाव वेळेपूर्वीच आटू लागतात.
सांगलीतील शिराळ्यात वनांची राख, निष्पाप जीव बेचिराख; नैसर्गिक सौंदर्य काळवंडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 4:09 PM