लोकमत न्यूज नेटवर्क
कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे, तर सर्वच राजकीय पक्षांकडे उमेदवारीसाठी मोर्चेबांधणीला गती आली आहे. पण, उमेदवारांचा ताळमेळ जमत नसल्याने नेतेमंडळींच्या उठाबशा सुरू आहेत. यामुळे कवठेएकंदची ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार होणार आहे.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या कवठेएकंदमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने काही
प्रभागात इच्छुकांची संख्या माेठी आहे. काही ठिकाणी योग्य उमेदवारच मिळेनासे झाले आहेत. यामुळे स्थानिक नेत्यांची घालमेल होत आहे. एकूणच ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात हाय व्हाेल्टेज ड्रामा दिसून येत आहे. गावच्या विकासाचे ध्येय घेऊन काही मंडळींनी मोजक्या जागा लढविण्याची तयारी केली आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सरशी केली होती. शेकाप व भाजपला मत विभाजनामुळे फटका बसला होता. दरम्यान, कवठेएकंद येथील एका पदाधिकाऱ्याने शिवबंधन बांधल्याने शिवसेनाही काय पवित्रा घेणार याकडे लक्ष आहे. तरीही निवडणुकीत कोण कोणाबरोबर दिसणार याचा नेम नाही. सर्वच राजकीय पक्षांना सतेत्त जागा हवी आहे. यामुळे स्वतंत्र लढण्याची तयारी करावी लागत आहे. दुसरीकडे काहींनी गावाच्या विकासासाठी निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा चालविली आहे. अशा अस्थिर परिस्थितीमुळे उमेदवारीचा ताळमेळ कसा घालायचा, असा प्रश्न नेत्यांसमाेर उभा ठाकला आहे.