सांगली : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिलेल्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्येच्या प्रकरणातील १२ भ्रूणांच्या ‘डीएनए’ तपासणीचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. यामध्ये पाच भ्रूण मुलींचे, तर तीन मुलांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. कायदेशीर सल्लाोऊन, गर्भपात करणाऱ्या दाम्पत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील, असेही त्यांनी सांगितले. मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेचे भ्रूणहत्येचे ‘रॅकेट’ उघडकीस आले होते. त्याने गर्भपात केलेले भ्रूण म्हैसाळ येथे ओढ्यालगतच पुरले होते. जेसीबीने खुदाई केल्यानंतर तब्बल १९ भ्रूण सापडले होते. यातील बारा भ्रूणांचे अवशेष ‘डीएनए’ तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये पाच अवशेष मुलींचे, तर तीन मुलांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील चार नमुन्यांचे निदान लावता आलेले नाही. काही अवशेष टॉवेलमध्ये गुंडाळलेले सडलेल्या स्थितीत सापडले होते. शिंदे म्हणाले, मुलींप्रमाणे मुलांचाही गर्भपात केल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास सुरू असताना गर्भपात करणाऱ्या दाम्पत्यांचाही शोध घेण्यात यश आले आहे. या दाम्पत्यांचे नमुने डीएनए तपासणीला पाठविले आहेत. त्यांचा अहवाल अजून आलेला नाही. अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाईल. कायदेशीर सल्ला घेऊन गर्भपात करणाऱ्या दाम्पत्यांविरुद्धही गुन्हे दाखल केले जातील. (प्रतिनिधी)
‘त्या’ दाम्पत्यांविरुद्ध गुन्हे नोंदविणार
By admin | Published: April 28, 2017 12:48 AM