सांगली : तानंग फाटा येथे चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. संतोष मारुती हाके (वय १९, रा. बागेवाडी, ता. जत) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून दोन लाख १० हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या प्रकारांमुळे चोरट्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, संशयित हाके हा तानंग फाटा येथील पुलाजवळ चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी थांबला आहे. त्यानुसार पथकाने त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले.यावेळी हाके याने पोलिसांना सांगितले की, त्याचा मित्र महंमद शेख (रा. सांगली) याने चोरी केलेल्या सहा दुचाकी विक्री करण्यासाठी त्याच्याकडे दिल्या आहेत. यातीलच एक दुचाकी विक्रीसाठी येथे थांबल्याचेही त्याने सांगितले. इतर दुचाकी त्याने त्याच्या घराजवळ ठेवलेल्या असल्याचेही सांगितले. पथकाने त्या सर्व दुचाकी जप्त करीत त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले.एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, अरुण पाटील, कुबेर खोत, विनायक सुतार, सुनील जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
दुचाकी विक्रीसाठी आला, सराईत चोरटा सांगली पोलिसांच्या जाळ्यात अडकला
By शरद जाधव | Published: December 20, 2023 5:41 PM