सांगली : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एरंडोली (ता. मिरज) येथील रोहित बाबासाहेब धेंडे (१९) या चोरट्याने पलायन केले. सांगलीच्या मुख्य बसस्थानकावर रविवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. प्रातर्विधीच्या बहाणा केल्यानंतर, तो पोलिसांना झटका देऊन पसार झाला.गेल्या महिन्यात मिरज ग्रामीण पोलिसांनी रोहित धेंडेला अटक केली होती. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या होत्या. नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याने मोटारसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत कोपरखैरणे पोलिसांत गुन्हा नोंद आहे. ग्रामीण पोलिसांचा तपास झाल्यानंतर रोहितची सांगली जिल्हा कारागृहात रवानगी झाली होती. चार दिवसांपूर्वी कोपरखैरणे पोलिसांनी न्यायालयातून रोहितचा ताबा मिळविला होता. कोपरखैरणे येथील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन हवालदार रोहितला पुन्हा सांगली कारागृहात सोडण्यासाठी शनिवारी रात्री मुंबईतून निघाले होते. रविवारी सकाळी ते सांगलीच्या मुख्य बस स्थानकावर उतरले. रोहितच्या हाताला बेडी होती. बसमधून उतरल्यानंतर प्रातर्विधीला जाणार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्या हाताची बेडी काढली. रोहितने दोन्ही पोलिसांना झटका मारून पलायन केले व गर्दीचा फायदा घेऊन तो पळून गेला. (प्रतिनिधी)
पोलिसांच्या हातावर तुरी देत चोरट्याचे पलायन
By admin | Published: January 09, 2017 4:19 AM