सांगली : येथील किसान चौकात राहणाऱ्या कर सल्लागाराच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारत १५ लाखाची रोकड लंपास केली. ही घटना गुरुवार २९ ते शनिवार १ ऑक्टोबर दरम्यान घडली. याप्रकरणी युनूस खुदूस नदाफ (वय ३३) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, वसंतदादा पाटील मार्केट यार्ड समोर असणाऱ्या किसान चौक येथे युनूस नदाफ कुटुंबियांसह राहतात. कर सल्लागार म्हणून ते काम करतात. कामातून मिळणाऱ्या मिळकतीमधून २५ हजारांची बचत करून ही रक्कम घरातील तिजोरीत ठेवली होती. तिजोरीची किल्ली त्या कपाटावर ठेवल्या होत्या. ही कुटुंबीयांतील सदस्यांना माहित होती. गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी बचत करून सुमारास १५ लाख रुपये साठवून ठेवले होते. रविवारी त्यांनी कपाटातील तिजोरीत २५ हजार रुपये ठेवले होते. त्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घरातील लोकांना खरेदीसाठी जायचे असल्याने त्यांनी पैसे देण्यासाठी लॉकर उघडले असता त्याठिकाणी केवळ ५० हजारांची रक्कम असल्याचे निदर्शनास आले.घडलेल्या या प्रकारानंतर कुटुंबीयांकडे पैशांबाबत त्यांनी विचारणा केली. पण कोणालाही त्याबाबत माहिती नव्हती. त्यानंतर नदाफ यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याने तिजोरी उघडून १५ लाखांची रक्कम चोरल्याची फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरीस गेलेल्या रकमेमध्ये २ हजारांच्या ३५० नोटा आणि ५०० च्या १ हजार ६०० नोटांचा समावेश आहे. कर सल्लागाराच्या घरावरच चोरट्यांनी डल्ला मारल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
कर सल्लागाराने बचत करून १५ लाख साठवले, चोरट्यांनी लंपास केले; सांगलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 11:49 AM