इस्लामपूर : नेर्ले (ता. वाळवा) येथील वाटमारी आणि बोरगाव येथे पडलेल्या दरोड्यापासून वाळवा तालुक्यात अनेक अफवांना ऊत आला आहे. याचाच फायदा स्थानिक भुरट्या चोरट्यांनी उठविला आहे. या अफवांचा धसका महिला वर्गाने घेतला असून, त्या घराबाहेर पडण्यासही तयार नाहीत. याबाबत पोलिसांकडून कसलीही कारवाई होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनीच रात्रगस्त सुरु केली आहे. दरम्यान, रविवारी सकाळी नंदीवाले समाज रहात असलेल्या परिसरातील उसात चोर असल्याची बातमी समजली. त्यामुळे येथील तरुणांनी उसाच्या चारही बाजूने हातात काठ्या, गुप्ती, तलवारी घेऊन पहारा दिला. उसात शिरुन पाहणी केली. परंतु हाती काही लागले नाही.वाळवा तालुक्यातील रहदारीच्या रस्त्यावर वाटमारीच्या अफवांना अक्षरश: ऊत आला आहे. प्रत्येक गावात वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात आहेत. कोण म्हणते आमच्या घरावर दगड पडले, कोण म्हणते आमच्या घराचे दार वाजवले, अशा अफवा पसरविल्या जात आहेत. हा प्रकार महिलांमधून मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.सध्या शेतातील कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. ऊस भांगलण, पाला काढणे यासाठी महिला मजूर लागतात. परंतु गेल्या चार दिवसात उसामध्येच चोरटे दबा धरून बसत आहेत. महिलांना धमकावून ते त्यांच्या गळ्यातील दागिने काढून घेत असल्याच्याही अफवा उठल्याने महिला मजुरांनी आता शेतात काम करण्यास जाणेच बंद केले आहे.या चोरट्यांच्या अफवांमुळे आता ग्रामीण भागातील लोक रात्री ९ च्या पुढे बाहेर पडत नाहीत. नदीकाठच्या सधन गावांतून घरटी १ पुरुष रस्त्यावर पहाऱ्यासाठी येत आहे. पहाटे ४ वाजेपर्यंत गावा-गावातून गस्त घातली जात आहे. याबाबत पोलिसांनी कळवूनही त्यांच्याकडून कसलीही कारवाई होत नाही. अथवा त्यांच्याकडून रात्रगस्तही घातली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वाळवा तालुक्यातील विविध गावांमधून चोर समजून परप्रांतीय मजूर, कामगारांना मारहाण झाली आहे. (वार्ताहर)शुक्रवारी दुपारी शाहूनगर परिसरात संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या एका युवकास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काहीच बोलत नाही. त्यामुळे तो वेडसर असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस ठाण्यात हा वेडसर निश्चलपणे पडून होता.पिकांचे नुकसान..!ग्रामीण भागातील ऊस शेतात चोर लपले असल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी उसामध्ये सोयाबीन, भुईमूग तसेच इतर कडधान्यांची पिके घेतली आहेत. चोर शोधण्यासाठी शिरलेल्या तरुणांकडून लहान पिके तुडवली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
वाळवा तालुक्यात चोरांचा सुळसुळाट
By admin | Published: July 12, 2015 11:20 PM