ढालगाव : चोरोची-ढालगाव रस्त्यावर मोटारसायकल व जीप यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आरेवाडीतील शालेय विद्यार्थी निलेश ज्ञानू कोळेकर (वय १३) हा जागीच ठार झाला. त्याचे चुलते पांडुरंग आप्पा कोळेकर (५५) हे गंभीर जखमी झाले, तर वडील ज्ञानू आप्पा कोळेकर (५०) हे किरकोळ जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री साडेआठ वाजता हा अपघात घडला. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निलेश कोळेकर, त्याचे वडील व चुलते हे चोरोची येथील श्री सिध्दनाथ यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्या बघून, नातेवाईकांच्या घरी जेवण करून मोटारसायकलवरून आरेवाडीला परतत होते, तर जीप चोरोचीकडे निघाली होती. चोरोचीजवळील धोकादायक वळणावर रस्त्यावर लावलेले दगड समोरून येणाऱ्या जीपच्या प्रकाशझोतामुळे कोळेकर यांना दिसले नाहीत. मोटारसायकल दगडावर आदळून तिघेही रस्त्यावर पडले. याच वेळी समोरून आलेल्या जीपची त्यांना धडक बसली. अपघातात निलेश जागीच ठार झाला. अपघाताची नोंद रात्री उशिरा कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली. (वार्ताहर)
चोरोचीजवळ जीपखाली सापडून विद्यार्थी ठार
By admin | Published: April 24, 2016 12:14 AM