मिरज : मिरजेत नवीन वर्षात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ठिकाणी घरे फोडून लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे.मिरज-पंढरपूर रस्त्यावर मगदूम मळा येथे निवृत्त सैनिक पांडुरंग कृष्णा कांबळे यांच्या घराच्या मागील दरवाजाची आतील कडी काढून बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पांडुरंग कांबळे, त्यांची पत्नी संतोषी व दोन मुले घरात झोपली होती.
चोरट्यांनी झोपेत असलेल्या संतोषी कांबळे यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याचे गंठण, घरातील कपाट फोडून पाच ग्रॅम सोन्याची कर्णफुले, ३५ हजार रोख रक्कम असा ६५ हजारांचा ऐवज चोरून नेला. संतोषी कांबळे यांना जाग आल्यानंतर काळे कपडे परिधान केलेल्या दोन चोरट्यांनी अंधारात पलायन केले. पांडुरंग कांबळे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.नंतर चोरट्यांनी सुभाषनगरजवळ बरगालेनगर येथे बापू महादेव माने व संजय केंगार या दोघांची पत्र्याची घरे फोडली. बापू माने यांच्या घरातील पत्र्याची पेटी व कपाटात ठेवलेले दोन तोळे सोन्याचे दागिने व दहा हजार रोख रक्कम चोरून नेली. तसेच शेजारी असलेल्या केंगार यांचे बंद घर फोडून पाच हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. बापू माने कुटुंबीय घरात झोपले असताना चोरीची घटना घडली.
चोरट्यांनी घरातील पत्र्याची पेटी बाहेर शेतात टाकून दिली. सकाळी चोरी झाल्याचे दिसल्यानंतर बापू माने यांनी पोलिसात धाव घेतली. याबाबत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.