दरीबडची : माडग्याळ (ता.जत) येथे शेतात आठवडाभरात सात लाखांची डाळिंब चोरट्यांनी लंपास केली. शेतातील डाळिंबाची चोरी होऊ लागल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. शेतकरी रात्री बागेत पहारा देत आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे.पूर्व भागातील माडग्याळ येथील शेतकऱ्यांनी डाळिंबाची मृग बहर धरला आहे. सध्या डाळिंब परिपक्व झाले आहेत. शेतकऱ्यांनी भीषण दुष्काळी परिस्थिती असताना विहीर, कुपनलिकेला असणाऱ्या पाण्यावर डाळिंब बहर धरला आहे. सध्या डाळिंबाला बाजारात चांगला दर आहे. यातच चोरट्यांनी डाळिंब लंपास केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात पांडुरंग सावंत यांचा दीड ते दोन टन माल (२ लाख रुपये किंमत), दत्तात्रय सावंत यांचा एक टन माल (दीड लाख रुपये), उमेश सावंत यांची ५०० किलो (५० हजार रुपये), भानुदास सावंत यांची ७०० किलो (७५ हजारांची), संतोष सावंत यांची एक टन (एक लाख रुपये), मल्लिकार्जुन सोलापुरे यांची एक टन (दीड लाख रुपये) असे एकूण सात लाख रुपयांची डाळिंब चोरी झाली.एका शेतकऱ्यास मारहाणसंतोष सावंत हा रात्री कृषी मोटार सुरु करण्यासाठी गेले होते. यावेळी चोरांनी त्यांना बेदम मारहाण केली व पसार झाले. पोलिसांनी तपास करुन चोरट्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सावंत व सीताराम माळी यांनी दिला.
Sangli: माडग्याळमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, आठवड्यात सात लाखांचे डाळिंब लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 4:59 PM