सांगली : येथील मार्केट यार्डजवळील ‘रिलायन्स ज्वेल्स’ दरोड्याचा मास्टरमाइंड सुबोधसिंग आणि अंकुरप्रताप रामकुमार सिंग या दोघांनंतर तिसरा साथीदार महंमद शमशाद महंमद मुख्तार (वय २३, रा. चेरिया, जि. बेगुसराय, बिहार) याला अटक करण्यात यश मिळाले. महंमद याने दरोड्यावेळी पिस्तूल घेऊन दहशत माजविली होती. बिहारमध्ये गेलेल्या पथकाने ही कारवाई करून त्याला सांगलीत आणले. मुख्तार याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवर सहा महिन्यांपूर्वी सुबोधसिंग याच्या टोळीने भरदुपारी दरोडा टाकला. पोलिस असल्याचे सांगत सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावत पिस्तूल उंचावत कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून पावणेसात कोटींचे दागिने गोळा केले. दागिने घेऊन जाताना एक ग्राहक आतमध्ये येऊन परत जात असताना त्याच्यावर गोळीबारही केला. सुदैवाने तो बचावला.भरदिवसा पडलेल्या दरोड्यानंतर पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले होते; परंतु पोलिसांनी कसून आणि खोलवर तपास करत दरोड्यात सहभागी असलेल्यांची पहिल्या टप्प्यात नावे निष्पन्न केली. बिहारमध्ये पथके रवाना केली. तेथे राहून तपास केला.दरोड्यावेळी मोटार चालवणारा चालक अंकुरप्रताप सिंग याच्या प्रथम मुसक्या आवळल्या. त्याला ताब्यात घेतल्यानंतर मास्टरमाइंड आणि देशातील कुख्यात ज्वेल थीफ सुबोधसिंग याला अटक करण्यासाठी तयारी केली; परंतु बिहारमधील कारागृहातून त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.त्यानंतर तो ताब्यात आला असून सध्या पोलिस कोठडीत आहे. सुबोधसिंगच्या अटकेनंतर बिहारमध्ये जाऊन तळ ठोकून राहिलेल्या पथकाने तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे महंमद मुख्तार याला चेरिया गावात जाऊन ताब्यात घेतले. त्याच्या घरावर छापा टाकून त्याच्या मुसक्या आवळल्या. महंमद मुख्तार याने दरोड्यावेळी टोळीतील सदस्यांची बनावट कागदपत्रे तयार केली. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे.मुख्तार गावामध्ये सेंट्रिंगचे काम करत होता. एका गुन्ह्यात बेऊर कारागृहामध्ये होता. त्यावेळी सुबोधसिंगच्या संपर्कात येऊन टोळीत सहभागी झाला. रिलायन्स ज्वेल्समध्ये दरोडा पडला त्यावेळी टोळीसोबत होता. पिस्तूल घेऊन शोरूममध्ये कर्मचाऱ्यांना धमकावले. सांगली पोलिसांचे यशरिलायन्स दरोड्यातील तिघांना अटक करण्यात आतापर्यंत पोलिसांना यश मिळाले आहे. आता उर्वरित साथीदार गणेश बद्रेवार, प्रताप राणा, कार्तिक मुजुमदार, प्रिन्सकुमार सिंग या संशयितांना अटक करणे बाकी आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील तिसरा साथीदार अटकेत, सांगली पोलिसांनी बिहारमध्ये केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 3:57 PM