दत्ता पाटीलतासगाव : भाजपचे खासदार संजय पाटील आणि राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या विरोधात तासगाव बाजार समितीसाठी तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतल्याची चर्चा आहे. दोन्ही नेत्यांना सक्षम तिसरा पर्याय देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तिसरी आघाडी निर्माण झाल्यास त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.येणाऱ्या काळात तालुक्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या निवडणुकीचा कौल निर्णय ठरणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून खासदार संजय पाटील, प्रभाकर पाटील, राष्ट्रवादीकडून आ. सुमनताई पाटील, रोहित पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लढतीचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. यापूर्वी बाजार समितीत राजकीय हेवेदावे बाजूला सारून बिनविरोध करण्यास प्राधान्य दिल्याचा इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक बिनविरोध होणार की नाही, याबाबत नेमके चित्र अद्याप स्पष्ट नाही. मात्र मतदारसंघात आमदार आणि खासदार यांना वगळून सक्षम तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याच्या हालचाली काही प्रमुख नेत्यांकडून सुरू आहेत. भाजप, राष्ट्रवादीचे नेते झाले सावध नुकतीच तिसऱ्या आघाडीच्या बाबतीत सावर्डे येथे तालुक्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. या बैठकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावध होऊन व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीत कोण सहभागी होणार, तिसरी आघाडी सक्षमपणे भाजप व राष्ट्रवादीला पर्याय देणार का? याचे तालुक्यात कुतूहल आहे.
Sangli- बाजार समिती निवडणूक: तासगावला आमदार, खासदारांच्या विरोधात तिसऱ्या आघाडीची मोट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 6:55 PM