कडेगाव : ताकारी सिंचन योजनेचे तिसरे आवर्तन गुरुवार, २२ एप्रिलपासून सुरू होणार आहे. हे आवर्तन १० जूनपर्यंत चालू राहणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात १५ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील पिकांना दिलासा मिळणार आहे.
चालू वर्षी १ डिसेंबरपासून १३ जानेवारी या कालावधीत ‘ताकारी’चे ४३ दिवसांचे पाहिले आवर्तन देण्यात आले होते. त्यानंतर २० फेब्रुवारीपासून २ एप्रिलपर्यंतच्या कालावधीत ४२ दिवसांचे आवर्तन देण्यात आले. आता २२ एप्रिलपासून १० जूनपर्यंत ५० दिवसांचे आवर्तन चालणार आहे.
ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील
शेतकऱ्यांना ८१/१९ फॉर्म्युल्याप्रमाणे एकरी ६१७२ रुपये पाणीपट्टी आकारणी केली जाते. २७ हजार ४३० हेक्टर लाभक्षेत्र असलेल्या या योजनेचे १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
उर्वरित क्षेत्र वितरिका आणि बंदिस्त जलवाहिनीची काही कामे अपूर्ण असल्यामुळे ओलिताखाली आलेले नाही. हे उर्वरित लाभक्षेत्रही लवकरच ओलिताखाली येणार आहे. योजनेच्या वितरिका क्रमांक २ चे काम पूर्ण होऊन पाणीपूजनही झाले. यामुळे आता कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे, कुंभारगाव व खानापूर तालुक्यातील जाधवनगर, बलवडी तसेच पलूस तालुक्यातील कुंडलचा काही भाग व कोयना वसाहत तसेच पलूस व आंधळी आदी गावांच्या २४०४ हेक्टर लाभक्षेत्राला पाणी मिळणार आहे.
चौकट
पाणीपट्टी वसुलीचा उच्चांक
सोनहिरा साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून वसूल केलेल्या पाणीपट्टीची १ कोटी ५० लाख, तर उदगिरी शुगर्स कारखान्याने ६५ लाखांची रक्कम योजनेकडे जमा केली आहे. याशिवाय क्रांती कारखान्याने ७२ लाखांचा धनादेश दिला आहे. एकूण ६ कोटी ७२ लाख रुपये इतकी उच्चांकी पाणीपट्टी वसुली झाली आहे.