तासगाव : केंद्र शासनाच्या निधीतून नगरपालिकेमार्फत बांधण्यात आलेल्या घरकुलांचे थर्ड पार्टी आॅडिट करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या नगरपालिकेच्या सभेत घेण्यात आला. घरकुल वाटपास मंजुरी देण्याचा नगरपालिकेचा विषय नगरसेवकांनी हाणून पाडला. घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बहुतांश नगरसेवक चांगलेच आक्रमक झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.नगराध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. ‘लोकमत’मधून घरकुल योजनेतील भ्रष्टाचार, निकृष्ट काम, बोगस लाभार्थी आणि हस्तांतरणाचा विषय ऐरणीवर आणण्यात आला होता. त्याची दखल घेत नगरसेवकांनी विषयपत्रिकेवरील घरकुल मंजुरी आणि वाटपाचा विषय हाणून पाडला. याबाबत वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणी करीत संपूर्ण योजनेचे ‘थर्ड पार्टी आॅडिट’ करण्याचा ठराव करण्यात आला.सभेत घरकुल योजनेबाबतच्या शासननिर्णयानुसार मंजूर लाभार्थ्यांकडून त्यांचा हिस्सा भरुन घेऊन, घरकुलांचे वाटप करण्याचाविषय विषयपत्रिकेवर घेण्यात आला होता. या विषयावरुन सदस्यांनी चांगलाच हल्लाबोल केला. नगरसेवक अविनाश पाटील यांनी पैसे भरुन घेण्यास विरोध केला. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सूचनेनुसार झोपडपट्टीधारकांना मोफत घरे देण्याचा निर्णय नगरपालिकेकडून घेण्यात आला होता. त्यामुळे कोणतेही पैसे भरून घेऊ नयेत, असे सांगितले. अनिल कुत्ते यांनी आक्रमक होत प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ३९३ पैकी ३१४ घरांना गळती लागलेली आहे. स्लॅबचे काम निकृष्ट आहे. अशा परिस्थितीत हस्तांतरण कसे करणार? असा प्रश्न उपस्थित केला. जळगावसारखा घरकुल योजनेतही महाघोटाळा झाला आहे. त्याची तातडीने चौकशी करुन कारवाई करण्याची मागणीही यावेळी कुत्ते यांनी केली.नगरसेविका रजनीगंधा लंगडे यांनी, निकषानुसार घरांचे वाटपच झाले नसल्याचा आरोप केला. मंजूर यादीनुसार घरकुलांचे वाटप करावे, अशी मागणी केली. घरकुलाच्या ठिकाणी पाण्याची सोय नाही, त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी यावेळी केली. सभेत नगरसेवक अविनाश पाटील यांनी नगरपालिकेच्या कारभाराचा चांगलाच पंचनामा केला. गरीब लोकांच्या योजनांचा सभागृहात सातत्याने खेळ मांडला जात आहे. जबाबदारपणे काम व्हायला हवे. कामाचा विषय मार्गी लागला नसताना विषयपत्रिकेवर विषय घेतलाच कसा? या प्रश्नाचे उत्तर द्या, अन्यथा सभात्याग करु, असा इशाराच अविनाश पाटील यांनी दिला. योजनेच्या निकृष्ट कामाचे थर्ड पार्टी आॅडिट करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. तसा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. घरकुलांच्या कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत या कामांची चौकशी होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी दिली. नगरसेवक अजय पाटील यांनीही नगरसेवक आणि प्रशासनाकडून घरकुलांचा विषय गांभीर्याने घेतला जात नसल्याचा आरोप यावेळी केला. (वार्ताहर)‘तो’ नगरसेवक कोण?घरकुलांचा लाभ देण्यासाठी एका नगरसेवकाने झोपडपट्टीधारकांकडून पैसे लाटले आहेत, असा आरोप नगरसेवक कुत्ते यांनी केला. यावर नगरसेवक मानकर, बाबासाहेब पाटील यांनी नाव जाहीर करण्याची मागणी केली. पैसे घेणाऱ्या नगरसेवकाविरोधात काही लोकांनी नगरपालिकेकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज वाचल्यावर नाव जाहीर होईल, असे कुत्तेंनी सांगितले. मात्र नगरपालिकेकडे हा अर्ज सापडला नाही. त्यामुळे पैसे खाणारा नगरसेवक कोण? याचे उत्तर गुलदस्त्यातच राहिले.सभेतील महत्त्वाचे ठराव शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदीशहरासाठी शववाहिका खरेदीचा निर्णयनव्याने लागवड केलेल्या वृक्ष संवर्धनासाठी सिमेंटचे ट्री गार्ड खरेदीचा निर्णयशिक्षण मंडळाच्या शाळांसाठी बेंचेस खरेदीचा निर्णयनगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडचा निर्णय
तासगावात घरकुलांचे ‘थर्ड पार्टी आॅडिट’
By admin | Published: June 26, 2015 11:09 PM