मिरज : मिरज बसस्थानकाजवळ हातगाड्या व विक्रेत्यांची अतिक्रमणे यामुळे वारंवार वाहतूक कोंडीमुळे रविवारी दुपारी आणखी एका अपघातात पुणे-कवठेमहांकाळ एसटीच्या चाकाखाली सापडून रुकमुद्दीन हुसेनसाब मोकाशी (वय ४६, रा. विजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला.
बसस्थानक व स्टेशन चौक परिसरात वाहतूक कोंडीमुळे येथे वारंवार अपघात होत आहेत. स्टेशन चौकात दोनच महिन्यापूर्वी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा येथे अपघातांची मालिका सुरुच असल्याचे चित्र आहे.मिरजेत गांधी चौक ते बसस्थानक या शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दोन महिन्यांपूर्वी एका दुचाकीस्वाराचा बळी गेला आहे. मात्र स्टेशन चौकात ड्रेनेज यंत्रणा खचल्याने लावलेले बॅरिकेट्स अद्यापही हटविण्यात आले नसल्याने चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. रविवारी याच रस्त्यावर रुकमुद्दीन मोकाशी यांचा बळी गेला. ते एसटी बसच्या चाकाखाली सापडले.मिरजेत रस्त्यांच्या दुरवस्थेकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्याने नागरिक हैराण आहेत. मोठी वर्दळ असलेल्या बसस्थानक चौकात तीन महिन्यांपूर्वी ड्रेनेज यंत्रणा खचून खड्डा पडल्याने महापालिकेने बॅरिकेट्स लावले आहेत.
चौकात लावलेल्या बॅरिकेट्सला धडकून व वाहतूक कोंडीत ट्रकखाली सापडून दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्यानंतर येथे लावलेले बॅरिकेट्स हटविण्यात आले. मात्र चौकामध्ये खचलेल्या ड्रेनेज यंत्रणेची दुरूस्ती न झाल्याने खड्ड्याभोवती लावलेले बॅरिकेट्स अद्याप तसेच आहेत.
राष्ट्रीय महामार्गात समावेश असलेल्या गांधी चौक ते बसस्थानक या प्रमुख रस्त्याची दुरवस्था झाली आहे. बसस्थानक चौकात रस्त्यावरील विक्रेते, हातगाड्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होते. राष्ट्रीय महामार्गात समावेश झालेल्या शिवाजी रस्त्याचे केवळ पॅचवर्क करण्यात येत आहे.
नादुरूस्त ड्रेनेज यंत्रणेमुळे गेले सहा महिने रस्त्याच्या मधोमध लावलेल्या बॅरिकेट्सचा स्टेशन चौकात वाहतुकीला अडथळा आहे. रात्रीच्या अंधारात बॅरिकेट्स न दिसल्याने अपघात होत आहेत.रस्ता व ड्रेनेज यंत्रणेच्या दुरूस्तीबाबत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वारंवार अपघातांचे प्रकार सुरू असल्याने नागरिक संतप्त आहेत. प्रमुख चौकात वारंवार खचणाऱ्या जीर्ण ड्रेनेज यंत्रणेची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.