चिंचणी मांगरूळ (ता. खानापूर) येथे भैरवनाथ मंदिराशेजारी तेराव्या शतकातील वीरगळ आढळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खानापूर : चिंचणी मांगरूळ येथे तेराव्या शतकातील वीरगळ संशोधकांना आढळले आहे. युद्धात वीरमरण आलेल्या योद्ध्यांच्या पराक्रमाचे कायमस्वरूपी स्मरण राहण्यासाठी दगडामध्ये कोरलेले शिल्प म्हणजे वीरगळ.
महाराष्ट्रात आढळणाऱ्या वीरगळ प्रामुख्याने आठव्या ते तेराव्या शतकातील आहेत. कर्नाटकातील वीरगळवर शीलालेख असल्याने निश्चित कार्यकाल सांगता येतो. महाराष्ट्रातील वीरगळवर मात्र तसे उल्लेख नाहीत. चिंचणी मांगरूळमधील वीरगळवरही तसा उल्लेख नाही. प्रामुख्याने मंदिराशेजारी असल्याने लोकांकडून त्याची पूजाअर्चा केली जाते. या भागातील एखाद्या धारातीर्थी पडलेल्या योद्ध्याची ती आठवण असावी. या वीरांचा इतिहास समाजासमोर येऊन योग्य सन्मान मिळाला पाहिजे, अशी भूमिका वीरगळ जनजागृती व संवर्धन मोहीम आणि दुर्गवेध मित्रपरिवाराने व्यक्त केली. चिंचणी मंगरूळमध्ये भैरवनाथाचे भव्य मंदिर आहे. त्याच्या शेजारीच अंदाजे तेराव्या शतकातील इतिहासाची साक्षीदार असणारी वीरगळ अगदी सुस्थितीत आहे. इतिहासाची साक्ष देणारे पुरातन मंदिर आणि तेथील वीरगळ यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास झाल्यास या गावांचा अज्ञात इतिहास समाजपटलावर येईल, असे मोहिमेतील सहभागी मारुती शिरतोडे यांनी सांगितले. विलास साठे, शिवानंद धुमाळ, अधिक कुमार, योगेश कुंभार, वैभव शिरतोडे, आविष्कार मदने, आदित्य कुमार तसेच महेश मदने यांनी वीरगळ शोधली.