रात्रं-दिवस पुस्तकात खुपसलेले डोके अखेर वर येते अन् दहावीच्या पहिल्या पेपरचा दिवस उजाडतो. नव्याची नवलाई...मनात उत्साहाचे बोट धरून आलेली धाकधूक...मित्र-मैत्रिणींना कित्येक दिवसानंतर भेटण्याचा आनंद...असं सारं वातावरण म्हणजे शैक्षणिक जीवनातील एक सुंदर सहलच. एखाद्या पाखरासारखे भुर्रकन परीक्षेचे दिवसही निघून जातात. मनावरील, शरीरावरील ताण पेपर संपेपर्यंत हलका होतो. त्यानंतर, सुट्टीचा मिळणारा आनंद हा अन्य कोणत्याही सुट्ट्यांपेक्षा सुंदर असतो. प्रत्येक दिवसागणिक हा आनंद बहरत जातो. आनंदाच्या वादळात हे दिवसही पाखरासारखे उडून जातात आणि पुन्हा एक उत्सुकतेचा दिवस विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहतो. तो दिवस म्हणजे निकालाचा.
पूर्वी दहावीच्या निकालाचा दिवस म्हणजे तर भन्नाट होता. सकाळी लवकर उठून देवाला नमस्कार करून, नवस बोलून पोरं घराबाहेर पडायची आणि थेट छापखाना किंवा पेपरच्या कार्यालयात जाऊन उभी रहायची. तुडुंब गर्दी निकाल पुस्तिकेच्या प्रतीक्षेत असायची. छापखान्याचा तो कर्मचारी बोर्डाची निकाल पुस्तिका घेऊन येताना एखाद्या बाॅलीवूड नटासारखा भासायचा. त्याला सन्मानाने गर्दीतून वाट द्यायची. तो सज्ज झाला की, मुले, त्यांचे पालक परीक्षा क्रमांक लिहिलेल्या कागदाच्या तुकड्यासह निकालासाठी त्याच्यावर तुटून पडायची. घामाघूम होऊन जेव्हा हातात त्याच कागदी तुकड्यावर निकाल कळायचा, तेव्हा लॉटरी लागल्यासारखा आनंद व्हायचा. किलोभर पेढे आणि काहीतरी गोड-धोड घेऊनच मग घर गाठायचे. गल्ली, कॉलनीत, नातलगांना उत्साहाच्या उधाणलेल्या लाटांवर स्वार होत आनंदवार्ता सांगायची. शुभेच्छांच्या वर्षावात ऐन उन्हाळ्यात न्हाऊन जायचे.
हळूहळू काळ बदलला अन् निकाल मोबाइलवर कळू लागले. निकाल संकेतस्थळावर येण्याची, नेटचा स्पीड मिळण्याची आणि त्यानंतरची आनंदाची, सेलिब्रेशनची सर्व प्रक्रिया तशीच राहिली. केलेल्या अभ्यासाप्रमाणे गुणांची बरसात निकालपत्रात झाली की, एखादा गड जिंकल्याची भावना मुलांच्या आणि पालकांच्या मनात निर्माण व्हायची. हे सर्व क्षण आजवरच्या अनेक पिढ्यांनी अनुभवले आणि हृदयाच्या कुपीत जपले. त्याचा दरवळ आठवणींच्या रूपातून नेहमीच आयुष्याला सुगंधीत करीत असतो.
कोरोनाच्या दुष्टचक्रात सापडलेली सध्याची दहावीतील नवी पिढी परीक्षा रद्द झाल्याने या सर्व क्षणांच्या आनंदाला मुकली. पालकांच्या आयुष्यातील मुलांच्या दहावीतील यशाचे गोडवे गाण्याची, त्यांचे मन भरून कौतुक करण्याची संधी हरवली. सारंच कसं बेचव झालं. उत्तीर्ण होण्याची प्रक्रिया म्हणजे एक अपघात वाटू लागला. शैक्षणिक आयुष्यातील एक बहर कोरोनामुळे वाया गेला. मार्च, २०१९ ते मार्च, २०२० पर्यंतचे दहावीचे एक वर्ष विस्कळीत झाले. कोरोनाच्या या दुष्काळात एप्रिलचा तेरावा महिना उजाडला आणि परीक्षा रद्दच्या निर्णयातून एका पिढीच्या हातातील आनंदाचे क्षण हिरावून नेणारा ठरला.