सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत अपूर्ण इतिवृत्तावरून शनिवारी मोठा गदारोळ झाला. विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगरसचिवांना धारेवर धरले, तर सत्ताधारी भाजपनेही नगरसचिवांवर खापर फोडत कारवाईची मागणी केली.
या गोंधळात सर्व विषय मंजूर करण्यात आल्याने विरोधी नगरसेवकांनी सभा बेकायदेशीर ठरविण्यासाठी थेट नगरसचिव कार्यालयातच दोन तासांहून अधिक काळ ठिय्या मारला. पण नगरसचिव कार्यालयात अनुपस्थित असल्याचे पाहून त्यांनी पळ काढल्याचा आरोप विरोधकांनी केला.
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अजिंक्य पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला सुरुवात होताच विरोधी नगरसेवकांनी मागील सभेचे इतिवृत्त देण्याची मागणी नगरसचिवांकडे केली. मात्र त्यांनी अद्याप इतिवृत्तच लिहिले नसल्याचे सांगताच गदारोळाला सुरुवात झाली. केवळ एकाच सभेचे नाही, तर मागील तीन सभांचे इतिवृत्त लिहिले गेले नसल्याचे उघड होताच संजय मेंढे, विष्णू माने, योगेंद्र थोरात, मनोज सरगर, अभिजित भोसले, रझिया काझी यांच्यासह विरोधी नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी नगरसचिव के. सी. हळिंगळे यांना धारेवर धरले.
त्यातच सभेचे कामकाज कायदेशीर की बेकायदेशीर, असा नवा वादही सुरू झाला. सभापती अजिंक्य पाटील यांनी इतिवृत्त लिहिले नसल्याबद्दल प्रशासनाला जाब विचारला.नगरसचिव कार्यालयाकडे अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने इतिवृत्त लिहिता आले नसल्याचे हळिंगळे यांनी सांगितले. त्यावरून पुन्हा गदारोळ झाला.
विरोधकांनी सभाच बेकायदेशीर असल्याचा दावा करीत अजेंड्यावरील सर्व विषयांना विरोध केला. भाजपचे नगरसेवक लक्ष्मण नवलाई, भारती दिगडे, अॅड. स्वाती शिंदे, प्रकाश ढंग, संजय कुलकर्णी यांनी प्रशासनाच्या कारभारावर आक्षेप घेत सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. तसेच नगरसचिवांवर कारवाईची मागणीही केली. अखेर सभापती पाटील यांनी नगरसचिवांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उपायुक्त स्मृती पाटील यांना दिले.
या गोंधळातच सत्ताधारी भाजपने अजेंड्यावरील सर्व विषय मंजूर करून सभा गुंडाळली. स्थायी सभेचे कामकाज संपल्यानंतरही गदारोळ सुरूच होता. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभेनंतर थेट नगरसचिवांचे कार्यालय गाठले. सत्ताधाºयांनी गुंडाळल्याचा आरोप करीत, नगरसचिव कार्यालयात ठिय्या मारला. यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनीही सदस्यांना पाठिंबा दिला.विरोधक झोपले होते का? : पाटीलगेल्या तीन सभांचे इतिवृत्त लिहिले नसल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. केवळ एकाच सभेचे इतिवृत्त लिहिलेले नाही. मागील दोन सभेचे इतिवृत्त मंजूर झाले आहे. तेव्हा विरोधक झोपले होते का? असा सवाल सभापती अजिंक्य पाटील यांनी उपस्थित केला. प्रत्येक विषयात विरोधक खोडा घालण्याचे काम करीत आहेत. जनतेच्या विकासाचे काम आले की विरोध सुरू आहे. आतापर्यंत आम्ही एकही विषय ऐनवेळी घेतलेला नाही. सारे विषय अजेंड्यावर घेऊनच मंजूर केले आहेत. ऐनवेळी विषय घुसडण्याची विरोधकांचीच परंपरा असल्याचा टोलाही त्यांनी लगाविला. आजची सभा कायदेशीर असल्याचे नगरसचिव आणि उपायुक्तांनी सांगितले आहे. त्यामुळे सभेतील सर्व विषय मंजूर केल्याचे ते म्हणाले.पारदर्शी कारभार यालाच म्हणतात का? : विरोधकमागील तीन सभांचे इतिवृत्त लिहिले गेले नाही, मग ही सभा कायदेशीर कशी? पारदर्शी कारभार यालाच म्हणतात का? असा सवाल काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. सत्ताधाºयांच्या सांगण्यावरूनच नगरसचिवांनी इतिवृत्त लिहिलेले नाही. यामागे ऐनवेळी ठराव घुसडून भ्रष्टाचार करण्याचा डाव आहे. चुकीच्या पध्दतीने प्रशासन आणि सत्ताधारी काम करत आहेत. सभा बेकायदेशीर असल्याबाबत आम्ही प्रशासनाला लेखी पत्र देण्याचा प्रयत्न केला; मात्र ते स्वीकारले नाही. त्यामुळे सभा कोणत्या कलमानुसार कायदेशीर आहे, त्याचे लेखी पत्र दिले नाही. उलट नगरसचिवांनी कार्यालयातून पळ काढल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला.विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणारस्थायी समितीची सभा बेकायदेशीर असल्याबाबत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. शनिवारी रजिस्टरद्वारे विभागीय आयुक्त कार्यालयाला निवेदन पाठविण्यात आले, तर मंगळवारी समक्ष विभागीय आयुक्तांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचेही विरोधी सदस्यांनी सांगितले.