बिळाशी : येथील परिसरात सुमारे तीस तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीराईवाडी येथील उपकेंद्रावरून कोकरूड, बिळाशी, मांगरूळ, चिंचोली, मोरेवाडी, धसवाडी, कुसाईवाडी, शिंदेवाडीला विद्युतपुरवठा होतो; परंतु शुक्रवारपासून अचानक या उपकेंद्रात बिघाड झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात वणवण करण्याची वेळ आली आहे.वारंवार विराईवाडी उपकेंद्रामध्ये बिघाड होतो. परंतु कोकरूड ग्रामस्थांच्या दबावामुळे हे गाव व माळेवाडीपर्यंत पणुंब्रे उपकेंद्राकडून जोडून घेतले जाते. बिळाशी, धसवाडी, वीरवाडी, मांगरूळ, कुसाईवाडी, दुरंदेवाडी, शिंदेवाडी ही गावे वारंवार अंधारात असतात. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यास त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. याबाबत कनिष्ठ अभियंता एस. पी. जाधव व कर्मचाऱ्यांची सर्व शिवारात फिरून बिघाड शोधण्याचा प्रयत्न दिवसभर केला. सायंकाळी उशिरा वीजपुरवठा सुरू झाला. (वार्ताहर)
बिळाशी परिसर तीस तास अंधारात
By admin | Published: July 20, 2014 11:38 PM