सांगली : येथील कृष्णा नदीत पोहणा-यांच्या घोळक्यात अचानक १८ फुटी मगर घुसली अन् सा-यांचा एकच थरकाप उडाला. ‘पळा...बाहेर पडा...अरे मगर आली’, असे म्हणत प्रत्येकाची आरडाओरड आणि धावाधाव सुरु झाली. सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण व मोहन पेंडसे यांनी प्रसंगाधाव राखून नावेतून पाठलाग करुन या मगरीला हुसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला. सकाळी साडेआठ ते नऊ या वेळेत ही थरारक घटना घडली. मगरीला वेळीच हुसकावल्याने ७० मुले बचावली.
कृष्णा नदीच्या काठावर दररोज मगरीचे दर्शन होते. तरीही दररोज पोहायला जाणाºयांची संख्या कमी झाली नाही. सध्या ऊन्हाळ्याचे दिवस असल्याने पोहायला प्रचंड गर्दी असते. विशेष शाळकरी मुले पोहण्यास शिकायला येत असल्याने गर्दी वाढली आहे. शनिवारी सकाळी साडे आठ वाजता वसंतदादा समाधीस्थळ ते सांगलीवाडी या मार्गावरील नदीकाठी दुतर्फा पोहायला गर्दी होती. वसंतदादांच्या समाधीस्थळापासून १८ फुटी मगरीने अचानक पाण्यात प्रवेश केला. पाण्यातून लपत ती पोहणाऱ्या लहान-मोठ्यांच्या घोळक्यात घुसली. मगर घुसल्याचे समजताच साºयांचा थरकाप उडाला. ‘अरे पळा मगर आली आहे’, असे काहीजणांनी सांगताच अनेकांची घाबरगुंडी उडाली. प्रत्येकजण पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धावाधाव करु लागला. विशेषत: शाळकरी मुले गोंधळून गेली. पाण्यातून बाहेर पडताना अनेकजण पायऱ्यांवर पाय घसरुन पडले.
पोहणाऱ्यांचा एवढा दंगा सुरु होऊनही मगर जाण्याच्या तयारीत नव्हती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण व मोहन पेंडसे यांनी नाव घेतली. नावेतून त्यांनी मगरीचा पाठलाग केला. बायपास पुलाच्यादिशेकडे मगर पळाली. तेथून ती गायब झाली. तिला वेळीच हुसकावल्याने पोहायला आलेली लहान-मोठी सत्तर मुले बचावली. अर्धातास हा थरार सुरु होता. त्यानंतर पोहणाऱ्यांना मगरीपासून सावध रहावे, असे आवाहन संजय चव्हाण यांनी केले. हरिपूर, विष्णूघाट, सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट येथेही पोहणाºयांना मगरीचे दर्शन झाले. या घटनेनंतर अनेकांनी काठावर बसूनही अंघोळ केली. शाळकरी मुलेही काठावरच थांबून राहिली. प्रत्येकाने आरडाओरड करुन मगर आल्याचे सांगितल्याने सर्वजण सावध झाले.
मगरींचा मुक्कामसांगली, हरिपूर, सांगलीवाडी, पद्माळे, ब्रम्हनाळ, भिलवडी, कसबे डिग्रज, तुंग या नदीकाठच्या मार्गावर गेल्या काही वर्षात मगरींची संख्या व त्यांचा मुक्काम वाढला आहे. मगरींच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. काहीजणांना कायमचे अपंगत्व आले आहे. तरीही वन विभागाकडून या मगरींचा बंदोबस्त करण्यासाठी काहीच उपाययोजना आखल्या जात नाहीत. नदीकाठी केवळ ‘मगरीपासून सावध रहावे’, असे फलक लावण्याशिवाय वन विभागाने काहीच केले नाही. मध्यंतरी या विभागाने केलेल्या सर्व्हेंत ९६ पेक्षा जादा मगरी आढळून आल्या होत्या. आता ही संख्या वाढली असण्याची शक्यता आहे.
नदीत दररोज मगरीचे दर्शन होते. पण सध्या ऊन्हाळ्याचे दिवस असल्याने लहान मुले मोठ्या प्रमाणात पोहायला शिकण्यासाठी येत आहेत. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आहे. वन विभाग काहीच करीत नसल्याने पालकांनी काळजी घ्यावी. पोहताना आजू-बाजूला लक्ष ठेवावे. आज ज्या मुलांनी प्रत्यक्षात मगर पाहिली आहे, ते उद्या भितीनेपोहायला येत नाहीत. - संजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, सांगली.