विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा नगर पंचायतीतर्फे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत शहरामध्ये जुन्या शंभर वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या झाडांची ‘हेरिटेज ट्री’ म्हणून निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनमार्फत शिराळ्यातील ३० झाडांची निवड करण्यात आली आहे. अशाप्रकारे जुन्या वृक्षांचे संवर्धन करणारी शिराळा ही राज्यातील पहिलीच नगर पंचायत ठरली आहे.
या निवड केलेल्या झाडांमध्ये वड, पिंपळ, चिंच, आंबा, काटेसावर, उंबर आदी झाडांचा समावेश आहे. ही सर्व झाडे शहराच्या विविध भागातून म्हणजेच तहसीलदार कार्यालय परिसर, इस्लामपूर रोड, पूल गल्ली, गोपाळकृष्ण पथ, कासार गल्ली, बस स्टँड परिसर, नाथ रोड, भुईकोट किल्ला परिसर, अशा विविध ठिकाणी आहेत.
हेरिटेज ट्री संकल्पनेच्या माध्यमातून शहरातील पूर्वजांनी जोपासलेली जुनी झाडे इथून पुढे संवर्धित आणि सुरक्षित होणार आहेत. नवीन लावलेल्या झाडांपेक्षा, पर्यावरणाला या हेरिटेज ट्रीच्या माध्यमातून जास्त फायदा होत असतो. तसेच नगर पंचायतीमार्फत ही सर्व ३० हेरिटेज ट्री प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनच्या मदतीने वृक्ष संवर्धित कराराद्वारे पुढील १५ वर्षांसाठी संरक्षित केली जाणार आहेत. या मोहिमेमध्ये खासगी मालकीची झाडे संरक्षित करण्यासाठी शेतकरी व इतर नागरिकांनीही आपल्या झाडाचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगराध्यक्ष सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे. नगर पंचायतीच्या या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या वृक्षांचे संवर्धनासाठी नगराध्यक्ष सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, मुख्याधिकारी योगेश पाटील तसेच सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि आकाश पाटील, प्रणव महाजन, आदी सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले आहे.