सांगली : चिंचलीच्या (ता. रायबाग, कर्नाटक) मायाक्का देवीच्या यात्रेला जाणाऱ्या भक्तांचा प्रवास यंदा अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे, शिवाय अडीच हजारांहून अधिक बैलांनाही विश्रांती मिळणार आहे. यात्रेकरुंनी बैलगाडीतून प्रवास टाळावा यासाठी ॲनिमल राहतने बसगाड्यांची सोय केली आहे.
मायाक्का देवीच्या यात्रेसाठी दरवर्षी हजारो भाविक बैलगाडीतून प्रवास करतात. अनेक भक्तांच्या कुटुंबात बैलगाडीतून यात्रेची पूर्वापार परंपरा चालत आली आहे. सुमारे १०० ते ३५० किलोमीटरचा प्रवास बैलगाडीतून केला जातो. कधीकधी आठवडाभर सलग प्रवास चालतो. यामध्ये बैलांचे अतोनात हाल होतात. हे लक्षात घेऊन ॲनिमल राहत संस्थेने यात्रेकरुंसाठी २६ एसटी बसेसची व्यवस्था केली आहे. यंदा सोमवारपासून (दि. ६) यात्रेस सुरुवात होत आहे. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, तासगाव, मिरज आदी तालुक्यांतील यात्रेकरुंसाठी संस्थेतर्फे बसेस देण्यात आल्या आहेत. संस्थेचे प्रतिनिधी शशिकर भारद्वाज म्हणाले की, दोन वर्षे गाड्यांची व्यवस्था करणार आहोत, त्यानंतर मात्र यात्रेकरुंनी स्वत: वाहनाने जाणे अपेक्षित आहे.
दरम्यान, यात्रा मार्गावर मंगसुळी, शेडबाळ व उगार येथे बैलांच्या तपासणीसाठी पथके नियुक्त केली आहेत. प्रवासामध्ये जखमी झालेल्या बैलांवर उपचार केले जाणार आहेत. प्राण्यांचे हाल करणाऱ्या यात्रेकरुंवर कारवाईची विनंती प्रशासनाला करण्यात आली आहे. मायाक्का देवस्थान समितीनेही यात्रेकरुंनी बैलगाड्यांऐवजी वाहनाने यात्रेस येण्याचे आवाहन केले आहे.