लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली, मिरजेसह जिल्ह्यात सोमवारी पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार ५०६ वाहनधारकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून तीन लाख १७ हजार चारशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात नाकाबंदी मोहीम बंद होती. परंतु सोमवारी आठवड्याच्या पहिल्यादिवशी ती पुन्हा तीव्रपणे राबविण्यात आली.वाहनधारकांना वाहतुकीची शिस्त लागावी, वाहतूक नियमांचे पालन व्हावे, अपघाताला आळा बसावा, यासाठी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी परिक्षेत्रात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील २५ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणी व महामार्गावर तसेच ग्रामीण भागातील मार्गावरील विविध चौक, पूल, बायपास रस्ते, महत्त्वाचे जंक्शन या ठिकाणी सकाळी आठ ते अकरा या वेळेत नाकाबंदी करण्यात आली होती. सांगलीसह कोल्हापूर, सातारा, सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्यात ही मोहीम सुरू आहे. मंगळवारीही नाकाबंदी केली जाणार आहे. आठवड्यातून दोनवेळा अशाप्रकारची कारवाई सुरू ठेवली जाणार आहे. पोलिसांचा ताफाजिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक ४, पोलिस निरीक्षक ७, सहाय्यक पोलिस निरीक्षक १६, उपनिरीक्षक २३, पोलिस शिपाई ३१६ नाकाबंदीच्या कारवाईत सहभागी झाले होते. दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांची यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली. १०८ बॅरिकेटस्चा वापर करण्यात आला.
जिल्ह्यात ४५ ‘पॉर्इंट’वर कसून नाकाबंदी
By admin | Published: May 09, 2017 1:15 AM