सांगली : शहरातील रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवरील दरोड्याच्या तपासामध्ये पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. उत्तर भारतातील एका टोळीतील तिघांकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. या दरोड्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्यावरून या तिघांकडून माहिती घेतली जात आहे.टोळीतील सदस्यांनी हैदराबादमध्ये एकत्र येत प्लॅन तयार केल्याचीही शक्यता असल्याने, काही पथकांकडून हैदराबादमध्येही तपास केला जात आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या तपासातूनही आणखी महत्त्वाची माहिती मिळाल्याचेही सूत्रांनी सांगितले.
वसंतदादा मार्केट यार्डजवळील रिलायन्स ज्वेल्स या दुकानातून रविवारी भरदिवसा दरोडेखोरांनी १४ कोटी रुपयांचे सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने लुटले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह पोलिसांची पाच जिल्ह्यांतील पथके वेगवेगळ्या ठिकाणी या दरोड्याचा तपास करत आहेत.दरोड्यासाठी वापरलेल्या मोटारीची खरेदी आणि त्यातील सहभागी व्यक्तीवरून पोलिसांचे पथक हैदराबादमध्ये तपास करत आहे, तर एका पथकाकडून बिहारमध्ये तपास सुरू आहे. यात तिघा संशयितांकडून याबाबत माहिती घेतली जात आहे. तिघांचाही दरोड्यातील सहभाग स्पष्ट झाला नसला, तरी एकूण प्लॅनमध्ये त्यांचा सहभाग असल्याच्या शक्यतेवरून पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे. यातूनच महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासात प्रगती असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.हैदराबादमध्ये तयार झाला प्लॅन?
दरोड्यातील सर्वजण हे बिहार, दिल्ली, आंध्र प्रदेशसह अन्य भागांतील असल्याची शक्यता आहे. या टोळीतील सदस्य असा ‘मोठा कॉल’ आला की, हैदराबादमध्ये एकत्र येतात आणि त्या ठिकाणी त्यावर पूर्णपणे प्लॅन करूनच मग दरोडा टाकतात, अशीही माहिती आहे. दरोड्यातील मोटार खरेदीतील दुव्यातून आता पोलिसांनी हैदराबादमध्येही चौकशी वाढविली आहे.