इस्लामपूर : राज्यातील वस्त्रोद्योग व्यवसायात आदर्श कामगिरी करणाऱ्या दीनदयाळ मागासवर्गीय सूतगिरणीच्या कामाविषयी काही नतदृष्टांकडून सतत तक्रारी केल्या जात आहेत. या तक्रारीवरून सूतगिरणीला नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र या नोटिसीला भीक घालणार नाही, असा इशारा देत संस्थापक-मार्गदर्शक अण्णासाहेब डांगे यांनी संचालक व कामगारांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. पुढच्या वर्षीची सभा नफ्याचा आनंद देणारी असेल, असा विश्वास व्यक्त केला.
वाघवाडी-इस्लामपूर येथील कार्यस्थळावर दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीची २५ वी वार्षिक साधारण सभा झाली. सूतगिरणीचे अध्यक्ष मारुती कांबळे अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी सभापती सचिन हुलवान, माजी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, अर्बन बॅंकेचे अध्यक्ष संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘जीवनगौरव’ पुरस्कार मिळाल्याबद्दल अण्णासाहेब डांगे यांचा, तर महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सूूतगिरणीचे कार्यकारी संचालक अॅड. चिमण डांगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
डांगे म्हणाले, कोरोनाचे संकट आणि वस्त्रोद्योगातील मंदीचा काळ यामुळे नेहमी नफ्यात असणाऱ्या सूतगिरणीला यावर्षी १ कोटी ६० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. मात्र यामुळे निराश होण्याचे कारण नाही. सूतगिरणीकडे कमी दरात खरेदी केलेला २० कोटींचा कापूस आहे आणि सध्या सुताचे दर वाढत आहेत. त्यामुळे येत्या वर्षभरात हा तोटा भरून निघेल आणि पुढच्यावर्षीची सभा ही सूतगिरणी पुन्हा नफ्यात आल्याची माहिती देणारी असेल.
उपाध्यक्ष प्रकाश बिरजे यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक अॅड. चिमण डांगे यांनी नोटीस वाचन केले. मारुती कांबळे यांनी अध्यक्षीय मनोगतात सूतगिरणीच्या कामाचा आढावा घेतला. भगवानराव साळुंखे, प्रा. अरुण घोडके, संपतराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब खैरे, माणिक गोतपागर, शोभाताई होनमाने, संजय देवकुळे, विलास काळेबाग, मंगल पवार, अनिलराव शेटके या संचालकांनी ठरावाचे वाचन केले. मकरंद देशपांडे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. अॅड. अशोक एडगे यांनी आभार मानले. सुमंत महाजन, चंद्रकांत पाटील, अशोक देसाई, जालिंदर कोळी, जि. प. सदस्य संभाजी कचरे, शिवाजीराव वाटेगावकर, सत्तू ढोले, श्रीकांत माने, किसन गावडे, सुनील मलगुंडे उपस्थित होते.
चौकट
गुणवंतांचा गौरव या सभेत वर्षभरात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आश्विनकुमार जाधव, संभाजी पाटील, अर्जुन आढाव, सुनील चव्हाण, वैभव पाटील, सुधीर माने या कामगारांना रोख रक्कम व मानचिन्ह देऊन अण्णासाहेब डांगे यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
फोटो : २३१२२०२०-आयएसएलएम-दीनदयाळ सभा न्यूज
ओळ : इस्लामपूर येथील दीनदयाळ सूतगिरणीच्या वार्षिक सभेत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भगवानराव साळुंखे, संपतराव पाटील, मारुती कांबळे, प्रकाश बिरजे, मकरंद देशपांडे, सुमंत महाजन, संदीप पाटील, अॅड. चिमण डांगे उपस्थित होते.