जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांनी श्रीलंका, पाकिस्तानकडे पाहावे, अजित पवारांचा भाजपला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 12:22 PM2022-05-16T12:22:05+5:302022-05-16T12:22:37+5:30
देशातले लोकही तुमच्या-माझ्यासारखी माणसेच आहेत. ज्यांनी सलोख्याचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला त्यांना लोक कधीही स्वीकारणार नाहीत.
सांगली : सत्तेसाठी देशात सर्वत्र सलोख्याचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांनी एकदा श्रीलंका, पाकिस्तानची अवस्था पाहावी, असा सल्ला रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला दिला.
सांगलीत दक्षिण भारत जैन सभेच्या शंभराव्या अधिवेशनात ते बाेलत होते. ते म्हणाले की, सत्ता येते व जाते, पण सत्तेसाठी शेकडो वर्षांची सलोख्याची परंपरा बिघडविणे योग्य नाही. समाज एकसंध राहावा म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. सत्तेच्या स्वार्थासाठी विनाकारण जाती-धर्मात भांडण लावण्याचा प्रयत्न सध्या सुरू झाला आहे. कोणत्याही धर्माने दुसऱ्याचा तिरस्कार शिकविला नाही. मग हे लोक कशासाठी हा प्रयत्न करताहेत? सत्ता मिळाली नाही की धार्मिक व भावनिक मुद्द्यांचे राजकारण सुरू केले जात आहे.
अशाच राजकारणातून श्रीलंका हा देश उद्ध्वस्त झाला. पाकिस्तानातही पंतप्रधानांना हटवावे लागले. या देशांशी आमचा काय संबंध, असे कोणाला वाटत असेल तर ती मोठी चूक ठरेल. त्या देशातले लोकही तुमच्या-माझ्यासारखी माणसेच आहेत. ज्यांनी सलोख्याचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला त्यांना लोक कधीही स्वीकारणार नाहीत.
जैन धर्मीयांनी सर्वात आदर्श मूल्ये जपली आहेत. अहिंसेबरोबर सलोखा व शांतीचा पुरस्कार त्यांनी केला आहे. काही राजकीय लोकांसाठी या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जैन समाजाने सर्व पक्ष, प्रांत, जाती-धर्माच्या लोकांना एकाच व्यासपीठावर आणले. ही किमया त्यांच्या आदर्श तत्त्वात आहे, असे गौरवोद्गार पवार यांनी काढले.