इस्लामपूर : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्यात राहुल आणि सम्राट महाडिक यांनी वर्चस्व सिद्ध केले आहे. वाळवा, शिराळा तालुक्याला पैसा कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली. पूर्वी सत्ता असताना पेठ-सांगली रस्त्याचे साधे पॅचवर्क न करणाऱ्यांनी या रस्त्याचे श्रेय घेऊ नये अशी टीकाही खाडे यांनी जयंत पाटील यांचा नामोल्लेख टाळून केली.पेठनाका येथील नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुलात भाजप कार्यकर्ता मेळावा आणि ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार खाडे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी मकरंद देशमुख, माजी आमदार सदाभाऊ खोत, ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, भाजप कार्यकारिणीचे प्रदेश सदस्य सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.खाडे म्हणाले, पालकमंत्री म्हणून माझ्या अखत्यारित वाळवा व शिराळा तालुक्याला ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. पेठ-सांगली रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून ८८२ कोटींचा निधी मंजूर करून आणला. जलजीवन मिशन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची पाणी योजना आहे. त्याचे श्रेय इतर कुणी घेऊ नये.सम्राट महाडिक म्हणाले, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे काम अजगरासारखे आहे. ग्रामपंचायतीमधील छोटे कामसुद्धा मीच केले, असे रेटून सांगतात. या प्रवृत्तीला जनता कंटाळली आहे.राहुल महाडिक म्हणाले, इथे प्रत्येकाच्या मनात मोदी आणि कमळ आहे. तुम्ही फक्त ताकद द्या. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवणारच.सुजित थोरात यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जयसिंगराव शिंदे, कपिल ओसवाल, स्वरूपराव पाटील, जयकर कदम, विद्याताई पाटील, डॉ. सचिन पाटील, अशोक पाटील, जगन्नाथ माळी, निजाम मुलाणी, सुशांत खाडे, प्रदीप पाटील, राहुल पाटील, सतीश पाटील, अमित ओसवाल, पै. बबन शिंदे उपस्थित होते.
गटबाजी तेवढी संपवा..!मेळाव्यात सम्राट, राहुल महाडिक आणि सदाभाऊ खोत यांनी गटबाजीचा मुद्दा मांडला. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांचा उल्लेख न करता त्यांच्याकडे याचा रोख ठेवला होता. आमची मदत घ्यायची आणि वर जाऊन स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, हे बंद झाले पाहिजे. पक्षाचे नुकसान टाळण्यासाठी ही गटबाजी संपवा, असे साकडे घातले.