जत : जत तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात भेटी देऊन तेथील अडीअडचणी सोडवू. वारणा योजनेंतर्गत येणाऱ्या ११७ गावांना योजनेतून अतिरिक्त पाणी देण्यासाठी प्रयत्न चालू असून जिल्ह्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. आता नाही म्हणणारे उद्या पक्षात प्रवेश करतील, असा टोलाही त्यांनी मारला.
राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा मंगळवारी येथे आली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले की, म्हैसाळ विस्तारित योजनेचा आराखडा तयार आहे. याला शासन मंजुरी मिळताच, अडीच ते तीन महिन्यांत कामाला सुरुवात होईल. त्यामुळे कोणी काय म्हणत आहे, याकडे लक्ष देऊ नका. आम्ही फसविणारे नाही. जतच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण करू.
ते म्हणाले, काहींनी पक्षप्रवेशाची यात्रा असल्याचा आरोप केला. पण मी पुन्हा येईन. जतला खास एक दिवस देणार असून, आता नाही म्हणणारे उद्या पक्षात प्रवेश करतील.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, राज्यात भोंग्यावरून वाद निर्माण केला जात आहे. लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून यांना भोंगा महत्त्वाचा वाटतो. राज ठाकरे यांनी ठाकरे ब्रँडचा दुरुपयोग करू नये. पक्षाला थेट जनतेत जाणारा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत जातीपेक्षा मेरिटला महत्त्व आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, प्रतीक पाटील, विराज नाईक, बसवराज पाटील, सुरेश शिंदे, रमेश पाटील, प्रकाश जमदाडे, ॲड. चन्नाप्पा होर्तीकर, मन्सूर खतीब, सुश्मिता जाधव, गीता कोडग, सिध्दुअण्णा शिरसाड, उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, उत्तम चव्हाण उपस्थित होते.