सांगली : कामगार समाजातील महत्त्वाचा घटक असताना, त्यांचा अपमान होईल असे वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. त्यामुळे कष्टकरी जनतेचा अवमान झाला असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राज्य घरकामगार मोलकरीण संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात वृत्तवाहिनीवर आमदार पडळकर म्हणाले होते की, ‘सांगलीचे पोलीस अधीक्षक पालकमंत्र्यांकडे कामगारांसारखे काम करतात, तर अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले पालकमंत्र्यांचा घरी धुणी-भांडी करणाऱ्या महिलेसारख्या वागतात,’ अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजेच लोकप्रतिनिधी म्हणून आमदाराने राज्यघटनेनुसार काम करण्याचे हमी देण्याचे वचन मोडलेले आहे. पडळकर यांच्या या वाक्यामुळे कामगारांविषयी त्यांचे मत दिसून येते.
कामगारांना अपमानित करणाऱ्या या वक्तव्याचा निषेध असून त्यांच्यावर कारवाईची मागणीही करण्यात आली. वयोवृद्ध मोलकरणींना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन द्यावी, सर्व मोलकरणींना आठवड्यात एक पगारी रजा मिळावी, त्यांना आरोग्य विमा सुरू करण्यात यावा अशाही मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी संघटनेच्या अध्यक्ष सुमन पुजारी, सचिव विद्या कांबळे, सुलोचना पाटील, सावित्री सायार, वंदना पाटील, गीता आंबी आदींनी आंदोलनत भाग घेतला होता.