मिरज : मिरजेतील संजय गांधीनगर येथील काळ्या खणीत दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. मृत माशांमुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. खणीत मासेमारी करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी येथील नागरिकांनी केली.मिरजेतील कुपवाड रस्त्यावर गव्हर्मेंट कॉलनीलगत संजय गांधीनगर येथे काळ्या खणीत गेल्या चार दिवसांपासून हजारो मासे मृत झाले आहेत. खणीतील पाणी दूषित झाल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. खणीभोवती मोठ्या प्रमाणात वसाहती असून सांडपाणी व कचरा खणीत टाकण्यात येतो. यामुळे पाणी दूषित होऊन गेल्या चार दिवसांपासून हजारो मासे मृत झाले आहेत.
परिसरात सर्वत्र मृत माशांची दुर्गंधी पसरली आहे. मात्र महापालिका आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. खणीतील मासेमारीसाठी ठेका आहे. मासेमारीसाठी हा प्रकार करण्यात आला आहे का, याची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली. खणीतील पाणी दूषित कशामुळे झाले, याच्याही चौकशीची मागणी होत आहे.